Air India Fine: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर कडक कारवाई करत ११०,३५० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वैध ‘एअरवर्थीनेस’ प्रमाणपत्र नसतानाही एअर इंडियाने एका एअरबस विमानाचे ८ वेळा उड्डाण केल्याचे समोर आले आहे.
या गंभीर चुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड झाली असून विमान वाहतूक क्षेत्रातील लोकांचा विश्वास कमी झाला असल्याचे ताशेरे नियामक संस्थेने ओढले आहेत.
नेमकी चूक काय झाली?
हे प्रकरण २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी घडले आहे. एअर इंडियाच्या एका एअरबस ए ३२० विमानाने दिल्ली, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद दरम्यान प्रवाशांना घेऊन उड्डाणे केली होती. कोणत्याही विमानाला उड्डाणासाठी दरवर्षी ‘एअरवर्थीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट’ (ARC) मिळवणे बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र विमानाच्या सुरक्षिततेची आणि तांत्रिक सुस्थितीची खात्री देते. मात्र, हे प्रमाणपत्र नसतानाही विमानाची उड्डाणे करण्यात आली.
प्रशासकीय अपयश आणि सीईओवर ताशेरे
डीजीसीएने पाठवलेल्या गोपनीय आदेशात एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांच्यावरही ठपका ठेवला आहे. ही घटना म्हणजे संस्थेच्या कामकाजातील ‘प्रणालीगत अपयश’ असल्याचे म्हटले आहे. एअर इंडियाला हा दंड ३० दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जून महिन्यात अहमदाबाद विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात २00 पेक्षा अधिक जणांचा बळी गेल्यानंतर विमान कंपन्यांच्या सुरक्षेबाबत अधिक कडक पावले उचलली जात आहेत.
एअर इंडियाचे स्पष्टीकरण
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना एअर इंडियाने म्हटले आहे की, “आम्हाला डीजीसीएचा आदेश प्राप्त झाला आहे. ही घटना आम्ही स्वतःहून २०२५ मध्ये कळवली होती. तपासादरम्यान आढळलेल्या सर्व त्रुटी आता दूर करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या आणि गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
वैमानिकांचीही जबाबदारी
एअर इंडियाच्या अंतर्गत चौकशीत असेही समोर आले आहे की, संबंधित ८ उड्डाणांच्या वेळी वैमानिकांनीही प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन केले नाही. टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सच्या मालकीच्या एअर इंडियाला अलीकडच्या काळात तातडीच्या उपकरणांची तपासणी न करणे आणि ऑडिटमधील त्रुटींबाबत डीजीसीएकडून अनेकदा इशारे देण्यात आले आहेत.










