Donald Trump on Iran War: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाच्या कालावधीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या मते, इराणसारख्या मोठ्या देशाविरुद्धची ही लष्करी कारवाई किमान 4 आठवडे किंवा त्यापेक्षा कमी काळ चालू शकते.
वॉशिंग्टनने या मोहिमेसाठी दीर्घकालीन तयारी केली असून हे युद्ध झटपट संपण्याऐवजी काही काळ टिकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
४८ इराणी नेत्यांचा खात्मा?
डोल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणमधील ऑपरेशन नियोजित पद्धतीने सुरू आहे. त्यांनी सांगितले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह लष्करी आणि राजकीय वर्तुळातील सुमारे 48 बड्या नेत्यांना या हल्ल्यात कंठस्नान घालण्यात आले आहे.
“आम्ही त्यांच्या संपूर्ण नेतृत्वाला उद्ध्वस्त केले आहे, जे आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आहे,” असे ट्रम्प यांनी नमूद केले. हे जगातील आतापर्यंतचे सर्वात गुंतागुंतीचे आणि प्रभावी लष्करी आक्रमण असल्याचेही त्यांनी ट्रुथ सोशलवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
अमेरिकन सैनिकांचा मृत्यू
या युद्धात अमेरिकेचेही नुकसान झाले आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिले लष्करी बळी असून, 3 अमेरिकन सेवा सदस्य या लढाईत मारले गेले आहेत. या सैनिकांचा उल्लेख ‘महान लोक’ असा करत ट्रम्प यांनी सांगितले की, मोहिमेची उद्दिष्टे साध्य होईपर्यंत लष्करी कारवाया पूर्ण ताकदीने सुरूच राहतील. इराणचे नेतृत्व संस्कृतीच्या विरोधात युद्ध पुकारत असून, अण्वस्त्र सज्ज इराण अमेरिकेसाठी मोठा धोका असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
चर्चेची दारे अद्याप उघडी?
तणाव शिगेला पोहोचलेला असतानाही ट्रम्प यांनी इराणी नेत्यांशी चर्चा करण्यास आपण अद्याप तयार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ही चर्चा नेमकी कधी होईल, याबाबत त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. “त्यांना आता बोलायचे आहे, पण मी त्यांना सांगितले की तुम्ही गेल्या आठवड्यात बोलायला हवे होते, या आठवड्यात नाही,” असे ट्रम्प यांनी डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सध्या ट्रम्प यांनी बहरीन, सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि जॉर्डनच्या नेत्यांशी चर्चा केली असून, लष्करी कमांडरशी सल्लामसलत केल्यानंतर ते लवकरच अमेरिकन जनतेला संबोधित करण्याची शक्यता आहे.









