Home / देश-विदेश / ‘मोदींशी मैत्री कायम राहील, पण…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर नरमला; पंतप्रधान म्हणाले…

‘मोदींशी मैत्री कायम राहील, पण…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर नरमला; पंतप्रधान म्हणाले…

Donald Trump on  PM Modi:

Donald Trump on PM Modi: गेल्याकाही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यांनी नुकतेच भारत आणि रशियाने चीनसोबत हातमिळवणी केल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, काही तासांनंतरच त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आपले संबंध खूप चांगले असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी मोदींसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केल्यानंतर पंतप्रधानांना देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले.

ट्रम्प ‘एक्स’वर (X) चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते, “असे दिसते की आपण भारत आणि रशियाला चीनकडे गमावले आहे. त्यांचे भविष्य एकत्र चांगले असो!”

या पोस्टबद्दल आणि भारताला चीनकडे गमावल्याबद्दल त्यांना विचारले असता, ट्रम्प म्हणाले की, “मला असे वाटत नाही की आपण त्यांना गमावले आहे. भारताने रशियाकडून इतके जास्त तेल खरेदी केल्यामुळे मी निराश आहे. हे मी त्यांना सांगितले आहे. आम्ही भारतावर 50% इतके मोठे टॅरिफ (आयात शुल्क) लावले आहे. पण तुम्हाला माहीत आहे, माझे मोदींसोबत खूप चांगले संबंध आहेत. ते काही महिन्यांपूर्वी येथे आले होते.”

‘रशियन तेला’चा मुद्दा आणि टॅरिफ

ट्रम्प यांनी भारत-रशिया ऊर्जा व्यापाराबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. मात्र, त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील त्यांच्या आधीच्या पोस्टपेक्षा त्यांची भूमिका खूपच सौम्य केली. ट्रम्प म्हणाले की, “मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. फक्त ते सध्या जे काही करत आहेत, ते मला आवडत नाही. पण भारत आणि अमेरिका यांच्यात एक विशेष संबंध आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही.”

यानंतर आता मोदी यांनी ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या भावना आणि भारत-अमेरिका संबंधांबद्दलच्या सकारात्मक भूमिकेचे मनापासून कौतुक करत असल्याचे ते म्हणाले.

भारत आणि अमेरिका यांच्यात एक अत्यंत सकारात्मक आणि दूरगामी, सर्वसमावेशक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतावर अतिरिक्त शुल्क लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासोबतच्या आपल्या संबंधांबद्दल सार्वजनिकपणे पहिल्यांदाच व्यक्त केले आहे.

ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वीच भारतीय आयातीवर 50% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, जे 27 ऑगस्टपासून लागू झाले. या शुल्कांपैकी निम्मे शुल्क भारत-रशिया तेल व्यापाराला दंड म्हणून लावण्यात आले होते.

दुसरीकडे, अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी एका मुलाखतीत असा दावा केला की, “मला वाटते की एका किंवा दोन महिन्यांत भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाटाघाटीसाठी येईल आणि माफी मागून काहीतरी करार करण्याचा प्रयत्न करेल.”, त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

प्रताप सरनाईक यांनी खरेदी केलेल्या भारतातील पहिल्या टेस्ला कारची किंमत किती? काय आहे खास? जाणून घ्या

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय चिन्हाचा अवमान; हजरतबल दर्ग्यातील अशोक स्तंभ असलेल्या फलकाची तोडफोड