Home / देश-विदेश / ‘… तर आणखी 10% टॅरिफ लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह BRICS देशांना थेट इशारा

‘… तर आणखी 10% टॅरिफ लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह BRICS देशांना थेट इशारा

Donald Trump BRICS Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा अतिरिक्त शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे....

By: Team Navakal
Donald Trump

Donald Trump BRICS Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा अतिरिक्त शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी BRICS गटाच्या अमेरिका-विरोधी धोरणांशी जुळवून घेणाऱ्या देशांना 10 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा इशारा दिला.

ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इंडोनेशिया आणि इराण यांचा समावेश आहे.

‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत त्यांनी ही घोषणा केली. ज्यामुळे जागतिक व्यापारात नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतासह BRICS देशांवर याचा परिणाम होऊ शकतो.विशेषतः भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असताना ट्रम्प यांनी अतिरित्त शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे.

ट्रम्प यांची ही घोषणा BRICS च्या ‘रिओ डी जनेरियो घोषणापत्रा’नंतर आली, ज्यात वॉशिंग्टनच्या रेसिप्रोकल शुल्कांवर टीका करण्यात आली होती. BRICS ने अतिरिक्त शुल्कवाढीमुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीला धोका असल्याचे म्हटले आहे. “एकतर्फी शुल्क आणि गैर-शुल्क उपाय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी विसंगत आहेत,” असे घोषणापत्रात नमूद आहे.

ट्रम्प यांचा इशारा

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, “BRICS च्या अमेरिका-विरोधी धोरणांशी जुळवून घेणाऱ्या कोणत्याही देशाला 10% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. याला कोणताही अपवाद नसेल.” त्यांनी कोणती धोरणे ‘अमेरिका-विरोधी’ आहेत, याची माहिती दिली नाही. त्याचवेळी, त्यांनी सांगितले की, अनेक देशांना नव्या शुल्क नियम आणि सुधारित व्यापार कराराच्या अटींची पत्रे पाठवली जातील.

भारत-अमेरिका व्यापार करार

भारत सध्या ट्रम्प प्रशासनासोबत व्यापार कराराच्या अंतिम वाटाघाटींमध्ये आहे. रिपोर्टनुसार, भारताने श्रम-केंद्रित क्षेत्रांना पाठिंबा देणारा करार प्रस्तावित केला आहे, पण तांदूळ, दुग्धजन्य पदार्थ, गहू आणि जनुकीय सुधारित पिकांवर सवलती नाकारल्या आहेत. पोलाद, ऑटोमोबाईल आणि ॲल्युमिनियमवरील शुल्क तात्पुरत्या करारात समाविष्ट होणार नाहीत. 9 जुलै रोजी भारतीय आयातीवरील 26% अतिरिक्त शुल्काच्या 90-दिवसांच्या निलंबनाची मुदत संपेल.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या