DRDO SFDR Test: भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) संरक्षण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या चांदीपूर येथील तळावरून भारताने स्वदेशी बनावटीच्या ‘सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट’ (SFDR) तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली. या यशासह भारत आता रशिया, चीन आणि अमेरिका यांसारख्या बलाढ्य देशांच्या पंगतीत सामील झाला आहे.
काय आहे ‘रामजेट’ तंत्रज्ञान?
एसएफडीआर हे पुढच्या पिढीतील क्षेपणास्त्र प्रणालीचे इंजिन आहे. पारंपारिक क्षेपणास्त्रांमध्ये इंधन जाळण्यासाठी ऑक्सिडायझरची गरज असते, ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. मात्र, रामजेट तंत्रज्ञान हवेतील ऑक्सिजनचा वापर करून इंधन जाळते. यामुळे क्षेपणास्त्र अधिक वेगाने आणि लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकते.
या तंत्रज्ञानामुळे भारताला अशा प्रकारची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित करता येतील, ज्यांचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. हे क्षेपणास्त्र केवळ वेगवानच नाही, तर शत्रूच्या विमानांना चकवा देण्यातही अत्यंत तरबेज आहे.
चाचणीचे यश आणि वैशिष्ट्ये
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चाचणी प्रक्रियेत इंधन प्रवाह नियंत्रक आणि बूस्टर मोटर यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर बसवण्यात आलेल्या विविध उपकरणांनी या चाचणीचा डेटा संकलित केला आहे.
या तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्रे 50 किमी ते 340 किमी अंतरावरील शत्रूचे लक्ष्य अचूकपणे टिपू शकतात. समुद्राच्या सपाटीपासून ते 20 किमी उंचीपर्यंत हे तंत्रज्ञान काम करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे इंजिन क्षेपणास्त्राला ‘मॅच 2’ ते ‘मॅच 3.8’ इतका प्रचंड वेग प्रदान करते, ज्यामुळे शत्रूच्या विमानाला पळून जाणे अशक्य होते.
भारतासाठी का आहे महत्त्वाचे?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. हे तंत्रज्ञान भारताला विदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. भविष्यात हे तंत्रज्ञान केवळ हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठीच नाही, तर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या प्रणालींसाठीही वापरले जाऊ शकते. यामुळे भारतीय वायुसेनेची ताकद कित्येक पटीने वाढणार असून हवाई युद्धात भारताचे वर्चस्व निर्माण होणार आहे.
हैदराबाद येथील प्रयोगशाळेने पुणे आणि इतर केंद्रांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक अत्यंत मोठे आणि निर्णायक पाऊल मानले जात आहे.









