Ethanol Blended Petrol: इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान होते का? सरकारने केले सर्व शंकांचे निरसन 

Ethanol Blended Petrol

Ethanol Blended Petrol: अनेक पेट्रोल पंपावर आता इथेनॉल मिश्रित पेट्रोल (Ethanol Blended Petrol) उपलब्ध झाले आहे. मात्र, सोशल मीडियावर या पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारने सर्व शंकाचे निरसन केले असून, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

20 टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) च्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांबद्दल सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (Ministry of Petroleum and Natural Gas) एक सविस्तर निवेदन जारी करून या शंकांना ‘निराधार’ म्हटले आहे.

‘E20’ पेट्रोलमुळे जुन्या वाहनांना धोका आहे किंवा ड्रायव्हिंगचा अनुभव खराब होतो, या बातम्यांमध्ये कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

एक्स (X) या सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने अनेक अभ्यासांचा हवाला दिला. ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (ARAI) आणि ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’च्या संशोधन विभागाने केलेल्या चाचण्यांमध्ये, ‘E20’ पेट्रोल हे सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. एक लाख किलोमीटरपर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये ‘E20’ आणि साध्या पेट्रोलमध्ये पॉवर, टॉर्क किंवा मायलेजमध्ये कोणताही मोठा फरक आढळला नाही.

मायलेजमध्ये किरकोळ घट

‘E20’ पेट्रोलबद्दलची एक मुख्य चिंता म्हणजे मायलेज कमी होते. इथेनॉलची ऊर्जा घनता पेट्रोलपेक्षा कमी असल्यामुळे मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते, असे मंत्रालयाने मान्य केले आहे. ही घट साधारणपणे 1-2 टक्के इतकी मर्यादित असते. जुन्या किंवा सुधारित नसलेल्या गाड्यांमध्ये ही घट 3-6 टक्के असू शकते. मात्र, ही घट फार मोठी नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ऑटोमोबाइल उत्पादकांनी एप्रिल 2023 पासून ‘E20’ च्या अनुकूल पार्ट्सचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे ‘E20’ मुळे गाडीचे पार्ट खराब होतात या शंकाही मंत्रालयाने फेटाळून लावल्या आहेत. जुन्या गाड्यांमध्ये काही रबर पार्ट 20 ते 30 हजार किलोमीटरनंतर बदलावे लागतील, पण हा एक सामान्य देखभाल खर्च आहे.

पर्यावरणासाठी फायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे

सरकारने पुन्हा एकदा सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल फक्त सुरक्षित नाही, तर ते पर्यावरणासाठीही टिकाऊ आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचे आहे. इथेनॉलमुळे पेट्रोलचा वापर कमी होतो आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते. नीती आयोगानेकेलेल्या एका अभ्यासानुसार, ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जन 65 टक्के कमी होते.

भारत 2014-15 पासून इथेनॉलमुळे 1.40 लाख कोटी रुपयांहून अधिक परदेशी चलन वाचवू शकला आहे. त्याचबरोबर, इथेनॉल खरेदी कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना 1.20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढला आहे.