Emmanuel Macron: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) आणि त्यांच्या ताफ्याला न्यूयॉर्कमध्ये पोलिसांनी अडवल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मोटरकेडमुळे त्यांना रस्त्यावर वाट पाहावी लागली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या घटनेनंतर मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना थेट फोन करून विनोदी शैलीत तक्रार केल्याचे समोर आले आहे.
ही घटना संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या अधिवेशनात मॅक्रॉन यांनी भाषण दिल्यानंतर लगेचच घडली. फ्रेंच दूतावासाकडे परतताना मॅक्रॉन यांच्या गाडीला न्यूयॉर्क पोलिसांनी थांबवले, कारण ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा केला जात होता.
French President Macron phoned US President Trump after being stopped at a New York street blocked off for his US counterpart's motorcade during the United Nations General Assembly pic.twitter.com/dIk13aIu7I
— Reuters (@Reuters) September 23, 2025
‘तुमच्यामुळे मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय’
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी मॅक्रॉन यांची माफी मागताना दिसतो. “मला माफ करा, मिस्टर प्रेसिडेंट. सध्या सर्व रस्ते बंद केले आहेत”, असे तो अधिकारी म्हणतो.
यानंतर मॅक्रॉन गाडीतून उतरले आणि थेट ट्रम्प यांना फोन लावला. फोनवर त्यांनी हसून म्हटले, “अंदाज लावा काय झाले आहे, तुमच्यामुळे मी रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे.”
ट्रम्प यांचा ताफा निघून गेल्यावर मॅक्रॉन गाडीत परत बसले नाहीत. ते थेट रस्त्यावरूनच दूतावासाकडे चालू लागले. यावेळी न्यूयॉर्कवासीयांसाठी हे एक दुर्मिळ दृश्य होते, कारण फ्रेंच राष्ट्राध्यक्ष कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय लोकांमध्ये मिसळले. अनेक लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दीही केल्याचे दिसून आले.
पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता
दरम्यान, मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण देताना एक मोठी घोषणा केली होती. फ्रान्सने पॅलेस्टाईनला औपचारिकपणे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे.
मॅक्रॉन म्हणाले की, “आता शांततेची वेळ आली असून, गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे आम्ही समर्थन करत नाही.” फ्रान्सच्या या घोषणेनंतर अनेक देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला.
हे देखील वाचा – सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले…