Environmental Sector : पुढील भविष्यात अर्थातच सर्क्युलर इकॉनोमी पर्यावरण( Environment) क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (Maharashtra Pollution Control Board) सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘पुर्नचक्रीत अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी’ या विषयांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन तुर्भे नवी मुंबई या ठिकाणी केले होते. या परिषदेचे उद्घाटन एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना एम देवेंदर सिंह म्हणाले की, वर्तमानात इमारत बांधणी क्षेत्र आणि त्यातून नवीन इमारतीची पुनर्बांधणी या सगळ्यांमधून निघणारा बांधकाम कचरा याकरिता नवीन नियमावली करणे अत्यंत गरजेचे असून यातून पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अकरा प्रकारच्या कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांची सूची “पुर्नचक्रीय अर्थव्यवस्था निर्देशिका २०२५′ तयार केली आहे. या कामाचे नुकत्याच कर्नाटक राज्यात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण परिषदेत कौतुक देखील करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याने प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम काम केले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील वारंवार घेत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तसेच १९७० च्या दशकात नैसर्गिक संसाधनांचा केला जाणारा वापर हा आता सहा पट वाढला असून त्यातून निर्माण होणारे प्रदूषणाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अग्रक्रम द्यावा लागेल त्याचबरोबर निश्चित कालमर्यादेत यावर उपाययोजना देखील कराव्या लागणार आहेत. याशिवाय ‘मंडळ इज ऑफ डूइंग बिजनेस’च्या माध्यमातून उद्योगांना निश्चितच चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेतच आणि त्या अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असा विश्वास देखील एम देवेंदर सिंह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.









