Ethiopia Volcano Ash Cloud: इथिओपियातील अफार प्रदेशात असलेला हायली गुब्बी ज्वालामुखी अचानक उसळला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 12,000 वर्षांतील हा या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा पहिलाच प्रसंग आहे. या उद्रेकामुळे परिसरातील गावांवर राखेचा जाड थर जमा झाला आहे.
या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेला धुराचा प्रचंड लोट आकाशात 14 किलोमीटर उंचीपर्यंत उसळताना दिसला. या राखेचे ढग उपग्रह चित्रांमध्ये तांबड्या समुद्रावरून तरंगताना दिसत आहेत. याचा परिणाम भारतावर देखील होताना दिसत आहे.
भारतातील अनेक राज्यांवर परिणाम
टूलोझ वॉल्केनिक अॅश अॅडव्हायझरी सेंटरनुसार, ज्वालामुखीमधून निघालेला धूर आणि राखेचे लोट यमन, ओमान, भारत आणि उत्तर पाकिस्तानपर्यंत वाहत आले आहेत. राखेचे हे ढग उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
राखेचे स्वरूप: राखेचा हा मोठा ढग सध्या इथिओपियातील ज्वालामुखी क्षेत्रापासून गुजरातपर्यंत आकाशात दिसत आहे. ज्वालामुखीचा उद्रेक थांबला असला तरी, राखेचे हे ढग वातावरणात मोठ्या उंचीवर पसरले आहेत.
वेग आणि उंची: हा राखेचा ढग 100-120 किमी/तास वेगाने उत्तर भारताकडे सरकत आहे. तो आकाशात 15,000-25,000 फूट ते 45,000 फूट उंचीपर्यंत पसरलेला आहे.
घटक: यात प्रामुख्याने ज्वालामुखीची राख, सल्फर डायऑक्साइड आणि काचेचे/खडकाचे छोटे कण समाविष्ट आहेत.
या राज्यांवर होणार परिणाम
हा राखेचा ढग रात्री 10 वाजेपर्यंत गुजरातच्या (पश्चिम भाग) हवाई हद्दीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर तो राजस्थान, वायव्य महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांच्या दिशेने पुढे सरकेल.
या राखेमुळे आकाश सामान्य दिवसांपेक्षा अधिक धुंद आणि अंधुक दिसण्याची शक्यता आहे. दिल्लीतील हवा यामुळे अधिक खराब होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी सांगितले की, जमिनीच्या स्तरावर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, परंतु आकाशात काही तासांसाठी धुके आणि ढगाळ वातावरण दिसेल.
विमान वाहतुकीवर मोठा परिणाम
राखेच्या ढगांमुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राखेचे ढग तांबड्या समुद्रावरून मध्य पूर्व आणि मध्य आशियाकडे सरकल्यानंतर एअरलाईन्सनी दुपारनंतर विमानांची उड्डाणे रद्द करण्यास सुरुवात केली. इंडिगोला दक्षिण भारतातून येणाऱ्या आणि मुंबईतून सुटणाऱ्या अशा सहा विमानांना रद्द करावे लागले.
पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र भारतीय एअरलाईन्ससाठी बंद ठेवले असल्याने, विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून जाणाऱ्या विमानांचे मार्ग पुन्हा निश्चित करावे लागले आहेत.
विमान वाहतूक नियामक डीजीसीए (DGCA) ने एअरलाईन्स आणि विमानतळांना इथिओपियातील ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या संभाव्य अडचणींना सामोरे जाण्यासाठी एक निर्देश जारी केला आहे. अकाशा एअर, इंडिगो आणि केएलएम यांसारख्या एअरलाईन्सनी यामुळे काही उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाने एक निवेदन जारी करत प्रवाशांची आणि विमानांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे.
हे देखील वाचा – Womens Kabaddi World Cup : भारतीय महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला; PM मोदींकडून अभिनंदन









