European Union on Pahalgam Attack | पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास (Kaja Kallas)यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी संपर्क साधत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, युरोपियन युनियनच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
युक्रेन-रशिया युद्ध (Ukraine-Russia War) दरम्यान घेतलेल्या कठोर भूमिकेच्या तुलनेत, भारत-पाकिस्तान संघर्षाच्या बाबतीत (India-Pakistan conflict) युरोपियन युनियनच्या (European Union) संयमाच्या आवाहनावर तज्ज्ञ आणि सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Rising tensions between India and Pakistan are alarming. I urge both sides to show restraint and pursue dialogue to ease the situation. Escalation helps no one. I spoke to both @DrSJaishankar and @MIshaqDar50 today to convey these messages.
— Kaja Kallas (@kajakallas) May 2, 2025
काजा कल्लास यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.
कल्लास यांनी त्यांच्या ‘एक्स’ (ट्विटर) वरील पोस्टमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेपलीकडील दहशतवाद बाबत एकही उल्लेख न केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. भारताला गेले कित्येक दशके या दहशतवादाचा सामना करावा लागत असूनही युरोपियन युनियनने या विषयावर मौन बाळगले असल्याने अनेकांनी यावरून टीका केली आहे.
कल्लास यांचा विरोधाभासी इतिहास उघड
रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी कल्लास यांनी रशियाविरोधात तीव्र शब्दात भूमिका मांडली होती. “संरक्षण म्हणजे चिथावणी नाही” आणि “आक्रमकाला थांबवले नाही तर तो कधी थांबणार नाही,” असे म्हणत त्यांनी युक्रेनच्या बाजूने स्पष्ट पाठिंबा दर्शवला होता. मात्र, आता पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केल्याने कल्लास यांच्यावर दुटप्पी भूमिकेसाठी सोशल मीडियावर टीका होत आहे.
जयशंकर यांचे 2022 मधील विधान पुन्हा चर्चेत
या प्रकरणामुळे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे 2022 मधील विधान पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले होते, “युरोपने हे समजून घ्यायला हवे की त्यांचे प्रश्न म्हणजेच जगाचे प्रश्न नसतात.” हे विधान युरोपियन दबावाच्या पार्श्वभूमीवर आले होते, जेव्हा युक्रेन युद्धात भारताला उघड भूमिकेसाठी भाग पाडले जात होते.