Marathi Language International Exam | एकीकडे महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेवरून वाद सुरू असताना, दुसरीकडे जगभरात राहणारे महाराष्ट्रातील नागरिक मराठी भाषा जोपासण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मराठी भाषेला जगभरात पोहोचवण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने (BMM) पुण्यातील महाराष्ट्र राज्य मुक्त शाळा मंडळासोबत मिळून पहिली आंतरराष्ट्रीय मराठी भाषा मूल्यमापन परीक्षा यशस्वीरीत्या घेतली आहे. विशेष म्हणजे अमेरिका, कॅनडा आणि डेन्मार्कमधील 103 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली असून, परदेशातील मुलांना सांस्कृतिक मुळांशी जोडण्यात हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
परीक्षेची रचना आणि निकाल
बालभारतीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा मे महिन्यात झाली होती, तर याच आठवड्यात निकाल जाहीर झाले. इयत्ता 1 ते 8 मधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांच्या मराठी भाषेचे वाचन, लेखन आणि आकलन कौशल्य तपासले गेले. जानेवारी 2024 मध्ये BMM आणि राज्य सरकारच्या सामंजस्य करारातून हा उपक्रम सुरू झाला होता.
परीक्षेला बसलेल्या 103 विद्यार्थ्यांपैकी, इयत्ता 1 ली आणि 3 री मध्ये सर्वाधिक 28 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. इयत्ता 2 री मधून 17, इयत्ता 4 थी मधून 15, इयत्ता 5 वी आणि 6 वी मधून प्रत्येकी 11, इयत्ता 7 वी मधून 10 आणि इयत्ता 8 वी मधून 5 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
BMM चे राहुल देशमुख यांनी माहिती दिली की, “ही सुरुवात मुलांच्या सांस्कृतिक जोडण्यासाठी होती, आता ती शैक्षणिक मान्यताही देते. 30 देशांत कॉलेज क्रेडिटसाठी गुण मान्य होतात, तर मराठीला परदेशी भाषा म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.” राजेंद्र अंधाळे यांनी सांगितले की, SCERT ने 40 शिक्षकांना प्रशिक्षण दिले असून, पुढील वर्षी 3,000 हून अधिक मुलांची नोंदणी अपेक्षित आहे.