Food Center : मुंबईतील भटके कुत्रे आणि मांजरी यावरून रोज नवीन वाद उदयाला येताना दिसतो शिवाय, खायला घालण्यावरून होणारे वाद तर मोठ्या प्रमाणावर होतात त्यामुळे हीच गैरसोयी टाळण्यासाठी मुंबई महापालिका महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पालिकेचा पशुवैद्यकीय आरोग्य विभाग शहरभर खाद्य केंद्रांसाठी जागा निश्चित करण्याच्या विचारात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने हे पाऊल उचलले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ७ नोव्हेंबर रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात दिशानिर्देश दिले होते. राज्य सरकारने पालिकेला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विविध संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आवारातून मोकाट श्वान हटवावेत. त्यांच्यासाठी खाद्य केंद्रे तयार करावीत. स्थानिक नागरी संस्थांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी मदत केंद्रे सुरू करावीत, असे निर्देश देण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या मते, मोकाट प्राण्यांना खायला घालण्याचे काम हे कोणत्याही अडथळ्याशिवाय अधिकृतपणे पार पाडले जावे, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, महापालिकेने समुदाय स्तरावर प्राण्यांना खायला घालणाऱ्या फीडर्सना स्वतःची नोंदणी करण्यासाठी आवाहन केले आहे. फीडर्स आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या अभिप्रायानंतर या खाद्य केंद्रांची जागा निश्चित केली जाणार आहे. ही केंद्रे प्रभागनिहाय असतील आणि प्रत्येक प्रभागात पुरेशी जागा निश्चित केली जाईल. सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही खाद्य केंद्र मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असेल, तर ते जवळच्या योग्य ठिकाणी हलवले जाईल.
प्रत्येक संस्थेला नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले जातील. त्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक असेल, जेणेकरून कोणत्याही समस्येवर त्वरित तोडगा काढता येईल. शहरात सध्या सुमारे २,००० नोंदणीकृत प्राणी फीडर्स आहेत. त्यामुळे आता यावरील हालचालीना कधी वेग येतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –









