Foreign University in India: उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतात आपले कॅम्पस उघडणाऱ्या विदेशी विद्यापीठांची फी ही त्यांच्या मूळ देशातील कॅम्पसच्या तुलनेत खूपच कमी असणार आहे.
शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यार्थ्यांना या विद्यापीठांमध्ये परदेशातील फीच्या तुलनेत ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी शुल्कात शिक्षण घेता येईल. काही कोर्सेससाठी तर ही फी केवळ २५ टक्के इतकीच राहण्याची शक्यता आहे.
१९ विदेशी विद्यापीठांना मिळाली परवानगी
केंद्र सरकारने आतापर्यंत १९ विदेशी विद्यापीठांना भारतात आपले कॅम्पस सुरू करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. यापैकी ५ विद्यापीठे गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये सुरू होणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नुकतीच ५ नवीन विद्यापीठांना मंजुरी दिली आहे, ज्यात ब्रिटनची क्वीन्स युनिव्हर्सिटी ऑफ बेलफास्ट, कोवेंट्री युनिव्हर्सिटी, सरे युनिव्हर्सिटी, अमेरिकेची इलिनोइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इटलीची आयईडी (IED) यांचा समावेश आहे. या विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्यासाठी एक प्रमुख अट घालण्यात आली आहे, ती म्हणजे त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांकडून त्यांच्या परदेशातील शुल्कापेक्षा निम्मी किंवा त्याहून कमी फी आकारावी.
कमी खर्चात जागतिक दर्जाचे शिक्षण
सध्या गिफ्ट सिटीमध्ये २ आणि गुरुग्राममध्ये १ अशा एकूण ३ विदेशी विद्यापीठांनी आपले शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. इतर विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होण्यासाठी साधारण १.५ ते २ वर्षांचा कालावधी लागू शकतो. या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची केवळ ट्युशन फीच वाचणार नाही, तर परदेशात राहण्याचा, खाण्याचा आणि प्रवासाचा होणारा मोठा खर्चही वाचणार आहे.
प्रत्येक विद्यापीठाची क्षमता सध्या १५० ते २०० जागांची असून, सर्व कॅम्पस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सुमारे ३,५०० ते ४,००० भारतीय विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील.
परदेशी विद्यापीठांच्या या पुढाकारामुळे भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून, मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना आता भारतात राहूनच जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवणे शक्य होणार आहे.









