Shibu Soren Dies at 81: झारखंडचे (Jharkhand) माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक शिबू सोरेन (Shibu Soren) यांचे सोमवारी (4 ऑगस्ट) दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. सोरेन हे राज्यसभेचे विद्यमान खासदार होते. (Shibu Soren Dies at 81)
त्यांचा मुलगा आणि सध्याचे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. “आदरणीय दिशोम गुरु आपल्याला सोडून गेले. आज मी पूर्णपणे रिकामा झालो आहे,” असे हेमंत सोरेन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
आदरणीय दिशोम गुरुजी हम सभी को छोड़कर चले गए हैं।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) August 4, 2025
आज मैं शून्य हो गया हूँ…
गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले शिबू सोरेन, जूनच्या शेवटच्या आठवड्यात किडनीच्या (kidney) आजारामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल होते.
‘दिशोम गुरु’ म्हणून ओळखले जाणारे नेते
‘दिशोम गुरु’ (महान नेता) या नावाने ओळखले जाणारे शिबू सोरेन भारतीय राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. तसेच, ते केंद्र सरकारमध्येही मंत्री होते.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, एक मोठे आदिवासी नेते आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेले शिबू सोरेन यांनी सुमारे चार दशके पक्षाचे नेतृत्व केले. 1987 मध्ये त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि एप्रिल 2025 पर्यंत ते पक्षाचे अध्यक्ष होते.
झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या चळवळीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मार्च 2005, ऑगस्ट 2008 ते जानेवारी 2009 आणि डिसेंबर 2009 ते मे 2010 या काळात ते मुख्यमंत्री होते. मात्र, राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचा एकही कार्यकाळ पूर्ण झाला नाही.
2005 मध्ये त्यांचे पहिले मुख्यमंत्रीपद फक्त नऊ दिवसांचे होते, कारण त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. ते 2004 ते 2006 या काळात तीन वेळा केंद्रात कोळसा मंत्री होते. सहा वेळा लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी 1980 ते 2005 या काळात काम केले. तसेच, ते तीन वेळा राज्यसभेवरही निवडून गेले होते.