Semiconductor Manufacturing in India: केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात 4,594 कोटी रुपये खर्च करून 4 नवीन सेमीकंडक्टर उत्पादन युनिट्स उभारण्यास मंजुरी दिली आहे. यापैकी दोन कारखाने ओडिशा राज्यात, तर प्रत्येकी एक आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये उभारले जाणार आहेत.
या चार नवीन प्रकल्पांमुळे कुशल व्यावसायिकांसाठी एकूण 2,034 रोजगारनिर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
या चार मंजुरींमुळे, आतापर्यंत ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ अंतर्गत एकूण 10 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे, ज्यात 6 राज्यांमध्ये सुमारे 1.60 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
केंद्र सरकारने म्हटले आहे की, “दूरसंचार, ऑटोमोटिव्ह, डेटा सेंटर्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेमीकंडक्टर्सची वाढती मागणी लक्षात घेता, हे चार नवीन प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.”
या प्रकल्पांनुसार, ‘SiCSem’ आणि ‘3D Glass’ हे युनिट्स ओडिशामध्ये, ‘CDIL’ पंजाबमध्ये, तर ‘ASIP’ आंध्र प्रदेशमध्ये उभारले जाईल.
भारतातील ‘पहिल्या मेड-इन-इंडिया’ चिपचे लवकरच लाँचिंग
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी सांगितले होते की, देशातील पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप लवकरच लाँच होणार आहे. गुजरात, आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये आधीच सहा सेमीकंडक्टर युनिट्सचे काम सुरू आहे.
त्यांनी सरकारच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाला सर्वांसाठी सुलभ बनवण्याच्या संकल्पावरही भर दिला. ते म्हणाले, “एआय आज आपल्या जगाला आकार देत आहे. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. ते सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे. म्हणूनच आम्ही ‘इंडिया एआय मिशन’ सुरू केले आहे, ज्यात आज 34,000 जीपीयूसर्व नवोद्योजकांसाठी सामान्य सुविधा म्हणून उपलब्ध आहेत.”
मंत्रिमंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय
याशिवाय, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने 5,801 कोटी रुपये खर्च करून लखनौ मेट्रो लाईनच्या विस्तारालाही मंजुरी दिली. शहराची वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि वाढत्या गरजा पूर्ण करणे हा यामागे उद्देश आहे.
मंत्रिमंडळाने गुवाहाटी येथे नवीन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे. तसेच, 8,146 कोटी रुपये खर्च करून 700 मेगावॉटचा ‘तातो-II जलविद्युत प्रकल्प’ (Tato-II hydroelectric Project) उभारण्यासही मंजुरी दिली आहे. ईशान्य भारतातील हे दुसरे आयआयएम (IIM) असेल, पहिले शिलॉंग येथे आहे.