FSSAI Holi anti adulteration drive 2026 : होळीचा सण जवळ येत असतानाच खाद्यपदार्थांमधील वाढती मागणी पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न भेसळीविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सणासुदीच्या काळात नफा कमवण्यासाठी अनेकदा अन्नपदार्थांत भेसळ केली जाते, ज्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी ‘होळी अँटी-अडल्टरेशन ड्राईव्ह 2026’ सुरू करण्यात आली आहे.
या पदार्थांवर असेल विशेष लक्ष
सणासुदीच्या काळात ज्या पदार्थांना सर्वाधिक मागणी असते, अशा वस्तूंच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मावा (खोया), पनीर, मिठाई, तूप, खाद्यतेल आणि नमकीन यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. भेसळ होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तिथे धाडी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बाजारात होणार जागच्या जागी तपासणी
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ म्हणजेच फिरत्या प्रयोगशाळांचा वापर केला जाणार आहे. गर्दीच्या बाजारपेठांमध्ये या मोबाईल व्हॅन तैनात केल्या जातील, जिथे खाद्यपदार्थांची जागच्या जागी चाचणी केली जाईल. यामुळे ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल आणि भेसळ करणाऱ्यांना चाप बसेल. ३१ मार्चपर्यंत या संपूर्ण कारवाईचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य
एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे की, सणासुदीच्या काळात होणारी भेसळ ही केवळ फसवणूक नसून सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका आहे. उत्पादक, वितरक आणि विक्रेते अशा सर्व स्तरांवर ही तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. निकृष्ट दर्जाचे किंवा आरोग्यास घातक असलेले पदार्थ बाजारात येणार नाहीत याची खात्री करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे नागरिकांना निर्भयपणे होळीचा सण साजरा करता येईल.













