Goa Nightclub Fire : गोवा येथील अंजुना भागातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 लोकांचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेनंतर काही तासांतच क्लबचे मालक असलेले सौरभ आणि गौरव लुथरा हे बंधू देशातून पळून गेले होते.
गोवा पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1.17 वाजता, जेव्हा अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी आग विझवत होते, नेमक्या त्याच वेळी या फरार बंधूंनी थायलंडचे विमान तिकीट ऑनलाईन बुक केले होते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आरोपी पळून जाण्याची तयारी करत होते. मेक माय ट्रिप या प्लॅटफॉर्मवर हे तिकीट बुक केल्याचे तपासकर्त्यांनी उघड केले आहे.
व्यवसायाच्या भेटीचा दावा
दुसरीकडे, लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात आपले पलायन नसून ही पूर्व-नियोजित व्यवसायाची भेट होती, असा युक्तिवाद केला आहे.
त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, सौरभ हा 6 डिसेंबर रोजी व्यावसायिक भेटीसाठी आणि नव्या रेस्टॉरंटच्या जागेच्या शोधार्थ थायलंडला गेला होता.
ते दोघेही तत्काळ अटक न करता भारतात परतण्यासाठी कायदेशीर संरक्षण मागत आहेत. भारतात येताच अटक होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
रोहिणी न्यायालयाने त्यांची ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मागण्याची विनंती ऐकून घेतली, परंतु तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.
दुसऱ्या शॅकवर कारवाई आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश
लुथरा बंधूंनी न्यायालयात असाही आरोप केला की, त्यांच्यावर केली जात असलेली कारवाई ‘प्रतिशोधात्मक’ स्वरूपाची आहे. त्यांनी यासाठी गोवा प्रशासनाने त्यांच्या दुसऱ्या गुंतवणुकीतील बीच शॅक पाडल्याचा संदर्भ दिला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अग्निसुरक्षा मंजुरी नसलेल्या मीठाच्या जमिनीवरील सर्व बेकायदेशीर बांधकामे त्वरित पाडण्याचे आदेश दिल्यानंतर हे पाडण्यात आला होता. हा हॉटेवही बेकायदेशीर आणि सुरक्षितता मानकांचे उल्लंघन करणारा होता, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तपास वेगाने सुरू
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी अजय गुप्ता याला गोवा पोलिसांनी दिल्लीतील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील तपासासाठी गोव्याला नेले जाणार आहे.
गोवा पोलिसांनी सांगितले की, आग लागण्यापूर्वीच्या आणि मुख्य आरोपींनी पळून जाण्याच्या प्रयत्नांच्या घटनांचा क्रम जुळवून तपास वेगाने सुरू आहे आणि आणखी अटक होण्याची शक्यता आहे.









