पणजी – राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता गोवा (Goa) राज्यात तिसरी ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची (students) सामायिक परीक्षा होणार आहेत. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जीएससीईआरटी ( GSCERT) अर्थात गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ काढणार आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी होईल. परीक्षेचे वेळापत्रक जीएससीईआरटीने जारी केले आहे. त्याचप्रमाणे ही परीक्षा नियमानुसार होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी जीएससीईआरटीचे फिरते पथक अचानक भेट देऊन पाहणी करणार आहे.
मंडळाने या सामायिक परीक्षेबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये इयत्ता तिसरी आणि चौथीची सामायिक परीक्षा ९ ऑक्टोबरपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतची परीक्षा ७ ऑक्टोबरपासून सुरू होतील. परीक्षेचे वेळापत्रक आणि नियमही निश्चित केले असून त्यानुसारच परीक्षा घेतल्या जातील.
परीक्षा घेताना शाळांवर काही जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी आजारी असल्यास किंवा इतर कारणांमुळे त्याला परीक्षेस बसणे शक्य झाले नाही, तर त्याच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याची जबाबदारी शाळांची असेल. तिसरी आणि सहावीसाठी कौशल्य-आधारित विषयांची परीक्षा होणार नाही. इयत्ता पाचवीच्या संस्कृत विषयाचा पेपर शाळांना काढावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पेपर लिहिण्याची वेगळी व्यवस्था करावी लागेल.