Google partners Adani: इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अर्थात एआय हबची निर्मिती करण्यासाठी पुढील पाच वर्षांत १५ अब्ज डॉलरची (सुमारे १.३३ लाख कोटी रुपये ) गुंतवणूक करणार आहे . हे देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारण्यासाठी गुगलने (Google) आदानी (Adani) समुहाच्या कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे मागील दहा-बारा वर्षांत देशातील बहुतांश उद्योग क्षेत्रे काबीज करणाऱ्या अदानी समुहाचा आता एआय क्षेत्रामध्येही दणक्यात प्रवेश झाला आहे.
भारत एआय शक्ती या कार्यक्रमात गुगलने यासंबंधीची घोषणा केली. विशेष म्हणजे अमेरिकेबाहेरची एआय हबसाठीची ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल असे गुगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) थॉमस कुरियन यांनी सांगितले.
अदानी समूह , गुगल आणि एअरटेल यांची अदानीकॉनएक्स कंपनी एआय डेटा सेंटर उभारणार आहे.त्यानुसार विशाखापट्टणमध्ये देशातील सर्वात मोठे एआय डेटा सेंटर उभारले जाईल . नवीन हरित ऊर्जा पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे.
यासंदर्भात अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, विशाखापट्टणममध्ये भारतातील सर्वात मोठे एआय डेटा सेंटर उभारण्यासाठी गुगलसोबत भागीदारी करण्याचा आम्हाला अभिमान आहे.या सुविधेत डीप लर्निंग,न्यूरल नेटवर्क प्रशिक्षण आणि मोठ्या प्रमाणात एआय प्रारुपांचे आकलन करणाऱ्या प्रणालीची निर्मिती केली जाईल. आरोग्य सेवा आणि कृषी क्षेत्रापासून लॉजिस्टिक्स आणि वित्त क्षेत्रांपर्यंत एआय आधारित अॅप्लिकेशन निर्माण करणारी एक परिसंस्था तयार केली जाणार आहे.
यासंदर्भात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पोस्ट मध्ये म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याशी एआय हब उभारण्याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यानंतर या ऐतिहासिक प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आम्ही आमचे उद्योग आणि तंत्रज्ञान भारतीय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यास उत्सुक आहोत.या एआय हबमुळे भारताच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल.
हे देखील वाचा –
क्रिकेट सामन्यावेळी नकार ! मात्र हाॅकीत भारत पाक खेळाडूंचे हस्तांदोलन
बाबासाहेब पाटलांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा ! इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूपतीसह ६० सशस्त्र नक्षलवाद्यांची शरणागती