पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता त्यांच्या जनता दल संयुक्त या पक्षाची धूरा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे सोपवावी असा सल्ला राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी दिला आहे. त्यांचा राष्ट्रीय लोकशाही मोर्चा हा पक्षही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील असून ते येत्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्याबरोबर आहे. मात्र, निशांत कुमार यांनी अजूनही याविषयी आपले मत व्यक्त केलेले नाही.
नवी दिल्ली येथे २९ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नितीश कुमार यांच्याकडे पक्षाची धूरा दुसऱ्यांदा देण्यात आली होती. तेव्हापासून तेच जनता दलाचे सर्वेसर्वा आहेत. नितीश कुमार यांच्या बद्दल उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले आहे की, नितीश कुमार यांनी आता वेळेचा व परिस्थितीचा विचार करावा. त्यांना आता पक्ष व सरकार या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस सांभाळणे कठीण आहे. राज्य चालवण्याचा त्यांचा दीर्घकालीन अनुभवाचा फायदा राज्याला व्हावा. मला व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांना असे वाटते की त्यांनी पक्षाची जबाबदारी त्यांचा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे द्यावी. हे पक्षाच्या हिताचे होईल. यामध्ये विलंब केल्यास पक्षाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान होऊ शकेल. मी हा सल्ला यासाठी देत आहे की कदाचित त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना हे सांगणे प्रशस्त वाटत नसेल. दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्विनी यादव यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या काही लोकांच्या फायद्यासाठी निशांत कुमार यांना पक्षापासून दूर ठेवले असावे.