Home / देश-विदेश / Haryana Resort Controversy : स्वच्छतागृहाच्या भिंतीवर शिवरायांचा फोटो; हरियाणातील रिसॉर्टमध्ये संतापजनक प्रकार- शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर व्यवस्थापनाची माघार

Haryana Resort Controversy : स्वच्छतागृहाच्या भिंतीवर शिवरायांचा फोटो; हरियाणातील रिसॉर्टमध्ये संतापजनक प्रकार- शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर व्यवस्थापनाची माघार

Haryana Resort Controversy : अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अत्यंत...

By: Team Navakal
Haryana Resort Controversy
Social + WhatsApp CTA

Haryana Resort Controversy : अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अत्यंत संतापजनक अवमान हरियाणातील एका रिसॉर्टमध्ये करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, समाजमाध्यमांवर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय?
हरियाणा राज्यातील सिकरी येथील मथुरा रोडवर ‘मिलन रिसॉर्ट’ नावाचे एक आलिशान हॉटेल आहे. या रिसॉर्टमधील एका बँक्वेट हॉलच्या परिसरात प्रसाधनगृहांच्या (वॉशरूम) प्रवेशद्वारावर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा उद्दामपणा व्यवस्थापनाने केला होता. पुरुषांच्या प्रसाधनगृहाच्या दरवाजावर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची प्रतिमा, तर महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रवेशद्वारावर ‘राणी पद्मिनी’ (पद्मावती) यांची प्रतिमा लावण्यात आली होती. ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रपुरुषांचा अशा प्रकारे वापर करणे हे अत्यंत हीन दर्जाचे कृत्य मानले जात आहे.

व्हिडिओ व्हायरल आणि शिवप्रेमींचा रोष-
हा प्रकार रिसॉर्टमध्ये आलेल्या एका सजग नागरिकाच्या निदर्शनास आला. त्याने तातडीने या घटनेचे चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला. कोट्यवधी जनतेची अस्मिता असलेल्या राजांचा फोटो प्रसाधनगृहाच्या दारावर लावणे हा निव्वळ योगायोग नसून तो जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. संतापलेल्या नागरिकांनी आणि विविध शिवप्रेमी संघटनांनी रिसॉर्ट प्रशासनाला धारेवर धरून तात्काळ माफी मागण्याची आणि प्रतिमा हटवण्याची मागणी केली.

हरियाणातील रिसॉर्टमधील महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान: शिवप्रेमींच्या तीव्र संतापानंतर व्यवस्थापनाची माघार; आता लावल्या घोड्यांच्या प्रतिमा-
हरियाणा राज्यातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमांचा प्रसाधनगृहाच्या प्रवेशद्वारावर वापर करून जो अवमान करण्यात आला होता, त्या प्रकरणी आता महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. शिवप्रेमींच्या वाढत्या दबावामुळे आणि संतापामुळे रिसॉर्ट प्रशासनाने अखेर नमती भूमिका घेतली असून, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या त्या दोन्ही प्रतिमा हटवल्या आहेत.

प्रतिमा हटवून घोड्यांची छायाचित्रे लावली-
मथुरा रोडवरील ‘मिलन रिसॉर्ट’ मधील प्रसाधनगृहांच्या दरवाजावर महापुरुषांच्या प्रतिमा लावल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली होती. शिवप्रेमींनी या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत रिसॉर्ट चालकांकडे या प्रतिमा तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रिसॉर्ट प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांचे फोटो तिथून काढून टाकले आहेत. विशेष म्हणजे, या महापुरुषांच्या प्रतिमांच्या जागी आता घोड्यांची छायाचित्रे लावण्यात आली असून, त्याचेही फोटो आता समोर आले आहेत.

रिसॉर्टच्या मालकीबाबत चर्चा-
या संतापजनक प्रकारानंतर सदर रिसॉर्ट नेमके कोणाचे आहे, याबाबतही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. हे रिसॉर्ट नवीन वशिष्ट आणि प्रदीप वशिष्ट यांच्या मालकीचे असल्याचा प्राथमिक दावा काही सूत्रांकडून केला जात आहे. तसेच प्रदीप वशिष्ट हे या रिसॉर्टचे माजी संचालक असल्याचेही सांगितले जात आहे. तथापि, या दाव्यांची अधिकृतरीत्या पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही.

घटनेचा व्यापक निषेध-
प्रसाधनगृहाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावणे हा निव्वळ निष्काळजीपणा नसून तो श्रद्धेचा अपमान असल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. जरी रिसॉर्ट प्रशासनाने आता प्रतिमा बदलल्या असल्या, तरी अशा संवेदनशील विषयात इतकी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून केला जात असला, तरी जनमानसातील रोष अद्याप शमलेला नाही.

छत्रपती शिवरायांच्या अवमानाप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आक्रमक-
हरियाणातील एका रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमांचा प्रसाधनगृहाच्या प्रवेशद्वारावर वापर करून करण्यात आलेल्या विटंबनेचे पडसाद आता राष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. या धक्कादायक प्रकारावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी रिसॉर्ट प्रशासनाला सुनावले आहे.

अस्मितेशी छेडछाड खपवून घेणार नाही-
या घटनेवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि अखंड प्रेरणेचे स्रोत आहेत. त्यांच्या सन्मानाशी छेडछाड करणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावण्यासारखे आहे.” सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या त्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमांचा वापर ‘पुरुष-महिला’ दर्शक चिन्हांसाठी (Signboard) करण्यात आला आहे, ती बाब अत्यंत गंभीर आणि निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

जाहीर माफीची मागणी –
रामदास आठवले यांनी याप्रकरणी संबंधित रिसॉर्ट आणि हॉल व्यवस्थापनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, व्यवस्थापनाने या प्रतिमा तात्काळ हटवून आपल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागावी. जर या संदर्भात त्वरित आणि समाधानकारक कारवाई केली गेली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. आरपीआयचे कार्यकर्ते थेट घटनास्थळी पोहोचून आपल्या शैलीत जाब विचारतील आणि कायदेशीर तसेच लोकशाही मार्गाने योग्य ते पाऊल उचलतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महापुरुषांची विटंबना हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर घणाघाती हल्ला-
हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमांचा प्रसाधनगृहाच्या फलकावर वापर करून जो अवमान करण्यात आला, त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कमालीचा संताप व्यक्त केला असून, या संपूर्ण प्रकरणासाठी भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरले आहे.

“महाराज, या लोकांना माफ करा”-
या धक्कादायक घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड अत्यंत भावूक आणि संतप्त झालेले पाहायला मिळाले. त्यांनी दोन्ही हात जोडून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत, “महाराज, या लोकांना माफ करा,” अशी आर्त साद घातली. महापुरुषांच्या विटंबनेचे हे प्रकार अपघाती नसून ते जाणीवपूर्वक केले जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.

भाजपच्या विचारधारेवर निशाणा-
जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी थेट भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाशी संबंधित काही मंडळींकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांची विटंबना केली जाते. हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. महापुरुषांचा अवमान करणे ही या लोकांची जणू पद्धतच झाली आहे.” वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असून, याकडे दुर्लक्ष करणे राज्याच्या आणि देशाच्या संस्कृतीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विटंबनेच्या राजकारणाचा निषेध-
हरियाणातील त्या रिसॉर्टमध्ये प्रसाधनगृहाच्या दरवाजावर महाराजांची प्रतिमा लावणे, हा केवळ अजाणतेपणा नसून तो जाणीवपूर्वक केलेला द्रोह असल्याचे आव्हाड यांनी सुचवले. महापुरुषांचा इतिहास आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न एका विशिष्ट विचारधारेकडून होत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ही बाब महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणारी असून, अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

छत्रपती शिवरायांच्या विटंबनेप्रकरणी रोहित पवार आक्रमक; ‘ते’ रिसॉर्ट कायमस्वरूपी बंद करून दोषींना तुरुंगात धाडण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, राज्य आणि केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. “महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सत्तेचा वरदहस्त लाभू नये,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

या संतापजनक प्रकरणावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, “अशा प्रकारच्या घटना जिथे कुठे घडल्या असतील, तिथे तातडीने कठोर कायदेशीर पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या राष्ट्रपुरुषांचा आणि महामानवांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाऊ शकत नाही. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित रिसॉर्ट प्रशासनावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.”

‘रिसॉर्ट बंद करा’-
रोहित पवार यांनी केवळ प्रतिमा हटवून हा प्रश्न सुटणार नसल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, “ज्या रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवरायांचा असा अपमान झाला, ते रिसॉर्ट तातडीने सील करून दीर्घकाळासाठी बंद ठेवले पाहिजे. दोषी व्यक्ती कोणाच्या जवळची आहे की विरोधातील, याचा विचार न करता निःपक्षपातीपणे कारवाई झाली पाहिजे. महापुरुषांच्या अस्मितेपेक्षा राजकारण मोठे असू शकत नाही, त्यामुळे या कृत्यास जबाबदार असणाऱ्यांना तात्काळ तुरुंगात धाडले पाहिजे, हीच आम्हा सर्वांची ठाम इच्छा आहे.

सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीची जाणीव-
हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील युतीची सत्ता असल्याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले. ते म्हणाले, “दोन्ही राज्यांत एकाच विचारांचे सरकार असल्याने, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी तातडीने हरियाणा सरकारला संपर्क साधून याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले पाहिजेत. जर सरकारने विनाविलंब ही पावले उचलली, तरच खऱ्या अर्थाने या सरकारचे अभिनंदन करता येईल. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून शिवरायांचा सन्मान राखला गेला पाहिजे.”

छत्रपती शिवरायांच्या विटंबनेप्रकरणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आक्रमक; भाजप सरकारवर डागली टीकेची तोफ
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “हे कृत्य पूर्णपणे अस्वीकार्य असून शिवरायांच्या वारशाचा हा घोर अपमान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

“प्रतिमेचा असा गैरवापर लज्जास्पद”
या धक्कादायक प्रकारावर प्रतिक्रिया देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी केवळ एक ऐतिहासिक राजा नसून ते अढळ श्रद्धास्थान आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. प्रसाधनगृहाच्या फलकांवर त्यांच्या प्रतिमेचा वापर करणे ही अत्यंत खालच्या पातळीची मानसिकता आहे. अशा प्रकारे महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. ही बाब केवळ संतापजनक नसून अत्यंत लज्जास्पद आहे.”

हरियाणा सरकारला कठोर इशारा
वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात हरियाणा सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “मी हरियाणा सरकारला विनंती करते की, त्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्या प्रतिमा त्वरित हटवाव्यात आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे जनभावना दुखावल्या जात आहेत, याचे भान प्रशासनाने राखायला हवे,” असे त्या म्हणाल्या.

हे देखील वाचा – Mahadev Munde Case: ‘वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या