Kejriwal bail : दिल्ली उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाविरुद्धच्या याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी अंतिम आणि शेवटची संधी दिली आहे. कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीतील एका कनिष्ठ न्यायालयाने जून २०२४ मध्ये केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र आतापर्यंत प्रत्येक सुनावणीत ईडीने वेळ मागून घेतला. आतापर्यंत दहावेळा ईडीने वेळ मागितल्याने सुनावणी पुढे ढकलावी लागली . यावेळी तसेच झाल्याने न्यायालयाने आता पुढची सुनावणी ही अंतिम संधी असल्याचे ईडीला बजावले .
न्या. रवींदर दुदेजा यांच्या पीठाने ईडीच्या वकिलांनी युक्तिवादासाठी दहाव्यांदा स्थगिती देण्याची केलेली विनंती मान्य केली. पण न्यायाच्या दृष्टीने ही शेवटची संधी असल्याचेही खडसावून सांगितले. अतिरिक्त सॉलिस्टर जनरल एस व्ही राजू हे ईडीतर्फे युक्तिवाद करणार आहेत. पण ते सध्या सर्वोच्च न्यायालयातील कामकाज व्यग्र असल्याचे सांगत ही स्थगिती मागण्यात आली होती.
तत्पूर्वी, केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी यांनी ईडीकडून वारंवार स्थगिती मागण्यावर तीव्र आक्षेप घेतला. ईडीने यापूर्वी नऊवेळा स्थगिती घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात गेल्यावर्षी २१ मार्च रोजी केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता आणि नंतर कनिष्ठ न्यायालयाने त्यांना नियमित जामीन दिला. याच प्रकरणात ईडीपाठोपाठ सीबीआयनेही केजरीवाल यांना अटक केली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयानेही जामीन दिल्याने केजरीवालांच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
हे देखील वाचा –
भारताची कृत्रिम बुद्धिमत्ताही अदानीच्या हाती! गुगलशी करार
बाबासाहेब पाटलांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा ! इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूपतीसह ६० सशस्त्र नक्षलवाद्यांची शरणागती