Henley Passport Index 2026: जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी म्हणजेच ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६’ प्रसिद्ध झाला आहे. भारतासाठी या यादीत एक विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. भारताने जागतिक क्रमवारीत १० स्थानांची मोठी झेप घेत ७५ वे स्थान पटकावले आहे.
मात्र, दुसरीकडे भारतीय पासपोर्टवर विना-व्हिसा प्रवास करता येणाऱ्या देशांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
रँकिंग वाढली पण प्रवेश कमी झाला?
२०२५ मध्ये भारत ८५ व्या क्रमांकावर होता, जो आता ७५ व्या क्रमांकावर आला आहे. जानेवारी २०२६ मध्ये भारत ८० व्या स्थानी होता, म्हणजेच अवघ्या एका महिन्यात भारताने ५ स्थानांची प्रगती केली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २०२५ मध्ये भारतीयांना ५७ देशांत विना-व्हिसा प्रवेश मिळत होता, जो आता ५६ वर आला आहे. रँकिंग सुधारण्याचे मुख्य कारण म्हणजे इतर अनेक देशांच्या पासपोर्टची ताकद भारताच्या तुलनेत अधिक वेगाने कमी झाली आहे.
इराण आणि बोलिव्हियाने का लादली बंदी?
भारताने या यादीत २ महत्त्वाचे देश गमावले आहेत:
१. इराण: नोव्हेंबर २०२५ मध्ये इराणने भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांसाठीची विना-व्हिसा सुविधा स्थगित केली. याचे कारण म्हणजे फसवणूक आणि मानवी तस्करीच्या घटना वाढल्या होत्या. अनेक भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवून इराणमध्ये बोलावले जायचे आणि तिथे त्यांचे खंडणीसाठी अपहरण केले जात होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इराणने व्हिसा अनिवार्य केला आहे.
२. बोलिव्हिया: बोलिव्हियाने आपली व्हिसा प्रणाली बदलली आहे. पूर्वी तिथे ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ मिळत असे, परंतु आता ई-व्हिसा (e-visa) अनिवार्य करण्यात आला आहे. हेनले इंडेक्सच्या नियमानुसार, ज्या देशात प्रवासापूर्वी कागदपत्रे अपलोड करून मंजुरी घ्यावी लागते, तो देश ‘विना-व्हिसा’ श्रेणीत गणला जात नाही.
जानेवारीतील घसरण आणि फेब्रुवारीत सुधारणा
जानेवारी २०२६ मध्ये भारताचा स्कोअर ५५ देशांवर आला होता. मात्र, फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘द गॅम्बिया’ या देशाने भारतीयांना विना-व्हिसा प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने हा आकडा आता ५६ वर पोहोचला आहे.
कसे ठरते हे रँकिंग?
हेनले पासपोर्ट इंडेक्स १९९ देशांच्या पासपोर्टचे २२७ ठिकाणांसाठी मूल्यमापन करतो. ज्या पासपोर्टवर पूर्वपरवानगीशिवाय (व्हिसा-फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल) जास्त देशांत जाता येते, तो पासपोर्ट अधिक शक्तिशाली मानला जातो. भारत सध्या अल्जेरिया आणि नायजर सारख्या देशांच्या बरोबरीने ७५ व्या स्थानावर आहे.










