ICAI CA May Exam 2025 Postponed | देशातील तणावपूर्ण आणि सुरक्षात्मक परिस्थितीमुळे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए मे 2025 परीक्षेचे (CA May Exam 2025) उर्वरित पेपर पुढे ढकलले आहेत.
ज्या उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.org वर अधिकृत सूचना तपासू शकतात.
भारत-पाकिस्तान तणावामुळे ICAI CA मे 2025 च्या उर्वरित परीक्षा स्थगित
चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमिडिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स परीक्षा [इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट (INTT AT)] मे 2025 चे उर्वरित पेपर 9 मे 2025 ते 14 मे 2025 दरम्यान होणार होते.
अधिकृत सूचनेत म्हटले आहे की, “सर्वसाधारण माहितीसाठी घोषित करण्यात येते की, देशातील तणावपूर्ण आणि सुरक्षात्मक परिस्थितीमुळे, चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमिडिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स परीक्षा [इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट (INTT AT)] मे 2025 च्या 9 मे 2025 ते 14 मे 2025 दरम्यान होणाऱ्या उर्वरित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित तारखा यथावकाश जाहीर केल्या जातील.”
यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार, ICAI CA मे परीक्षा 2 मे 2025 ते 14 मे 2025 दरम्यान होणार होती. सीए इंटर परीक्षेतील गट 1 च्या उमेदवारांसाठी परीक्षा 3, 5 आणि 7 मे रोजी, तर गट 2 ची परीक्षा 9, 11 आणि 14 मे रोजी होणार होती.
फायनल परीक्षेतील गट 1 ची परीक्षा 2, 4 आणि 6 मे रोजी आणि गट 2 ची परीक्षा 8, 10 आणि 13 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. इंटरमिडिएट कोर्सच्या पेपरची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती. फायनल परीक्षेतील पेपर 1 ते 5 ची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि पेपर 6 ची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती.
या परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit cards) देखील जारी करण्यात आले होते आणि ते अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मात्र, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. अधिक माहितीसाठी उमेदवार ICAI ची अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.