IIM-कोलकाता बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण, पीडित तरुणीचे वडील म्हणाले, ‘ती गाडीतून पडली’; पोलीस चौकशी सुरू

IIM Calcutta

IIM Calcutta | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता (IIM-C) या प्रतिष्ठित संस्थेत एका कथित बलात्कार प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थीनीने आयआयएम कोलकातामधील वसतिगृहात तिच्या अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली

मात्र, या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले असून, पीडितेच्या वडिलांनी बलात्काराचा दावा फेटाळला आहे. मुलगी ऑटो रिक्षातून पडल्याने बेशुद्ध झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे.

काय घडले?

तक्रारदार महिला आयआयएम-कोलकाताची विद्यार्थिनी नाही. ती समुपदेशन सत्रासाठी आरोपी महावीर तोप्पणवर उर्फ परमानंद जैन याच्याशी भेटायला वसतिगृहात गेली होती. तिच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला पिझ्झा आणि पाणी दिले, ज्यामुळे तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली.

बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात आढळले की, तिने वसतिगृहात आपले नाव नोंदवले नव्हते. आरोपीला 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

वडिलांचा धक्कादायक खुलासा

पीडितेच्या वडिलांना फोन आला की त्यांची मुलगी ऑटो रिक्षातून पडली असून, तिला एसएसकेएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल केले आहे. वडिलांनी मीडियाला सांगितले, “माझ्या मुलीचा बलात्कार झाला नाही. ती ऑटोतून पडल्याने शुद्ध हरपली होती.” त्यांनी पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीवर विश्वास ठेवण्यास नकार दिला.

आरोपीच्या आईनेही मुलाचा बचाव करत त्याला निर्दोष ठरवले आणि असा कृत्य करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. एकीकडे मुलीने अत्याचाराचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे वडिलांनी मुलगी गाडीतून पडल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

आयआयएम-कोलकाताने निवेदन जारी करत या प्रकरणात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबल्याचे सांगितले. संस्था सुरक्षित आणि सन्मानजनक कॅम्पस वातावरण राखण्यासाठी कटिबद्ध असून, पोलिसांना सहकार्य करत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.