Imran Khan | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू? काय आहे सत्य? जाणून घ्या

Imran Khan Death Rumors

Imran Khan Death Rumors | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतरही काही तासांतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. एकीकडे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

इम्रान खान (Imran Khan) यांच्या कथित मृत्यूची बातमी आणि रक्ताने माखलेला फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

बनावट कागदपत्रांमुळे अफवांना उधाण

एका व्हायरल झालेल्या प्रेस नोटमध्ये दावा करण्यात आला होता की, इम्रान खान यांचा तुरुंगात “रहस्यमय परिस्थितीत” मृत्यू झाला. या प्रेस नोटवर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नाव छापलेले होते आणि त्यात पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी एका लीक कागदपत्रात देखील खान यांना “न्यायालयीन कोठडीत मृत” झाल्याचे म्हटले गेले होते.

मात्र, नंतर स्पष्ट झाले की व्हायरल झालेला फोटो 2013 मधील आहे. त्या वेळी लाहोरमधील एका प्रचारसभेत इम्रान खान हे फोर्कलिफ्टवरून पडून जखमी झाले होते. जुना व्हिडीओ आणि फोटो पुन्हा वापरून त्यांने जेलमध्ये मारण्यात आल्याचा खोटा प्रचार करण्यात आला.

सरकारकडून अफवांचे खंडन

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या बातमीला खोटे (Fake News) ठरवत, मृत्यूची घोषणा करणारी प्रेस रिलीज “बनावट” असल्याचे अधिकृतरित्या सांगितले आहे. त्यांनी जनतेला अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनीदेखील या पोस्ट्सना “misinformation” म्हणून चिन्हांकित करायला सुरुवात केली आहे. दरम्यान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) सध्या इस्लामाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या सुटकेसाठी याचिका दाखल करत आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, खान यांच्या आरोग्याला त्यांच्या कोठडीमुळे धोका निर्माण झाला आहे, आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे.