Imran Khan Death Rumours : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असतानाच, त्यांची भेट घेण्यासाठी आदिआला तुरुंगाबाहेर आलेल्या त्यांच्या 3 बहिणींवर पोलिसांनी क्रूरपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या वयोवृद्ध बहिणींनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान अनेक प्रकरणांमुळे तुरुंगात आहेत.
तुरुंगाबाहेर बहिणींवर क्रूर हल्ला
इम्रान खान यांच्या बहिणी नूरीन नियाझी, अलीमा खान आणि डॉ. उझमा खान या तुरुंगाबाहेर त्यांच्या भावाची भेट घेण्यासाठी एक महिन्यापासून प्रतीक्षा करत होत्या, पण त्यांना भेट नाकारण्यात आली. त्यांनी आरोप केला की, त्या शांतपणे बसल्या असताना, पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
त्यांनी या हल्ल्याला ‘क्रूर आणि सुनियोजित’ म्हटले आहे. या बहिणींनी पंजाबसचे पोलीस प्रमुख उस्मान अन्वर यांच्याकडे औपचारिक तक्रार केली आहे. नूरीन नियाझी यांनी सांगितले की, “71 वर्षांच्या वयात मला केस पकडून फरफटत रस्त्यावर ओढले आणि जमिनीवर आदळले, ज्यामुळे मला दृश्य जखमा झाल्या आहेत.”
बहिणींचा आरोप आहे की, पोलिसांनी रस्त्यावरील दिवे बंद केले आणि अधिकाऱ्यांनी त्यांना ओढत नेले आणि मारहाण केली. इम्रान खान यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आम्ही येथे आलो होतो आणि कोणताही कायदा मोडला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या सदस्यांनाही मारहाण झाली.
इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांनी वातावरण तापले
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या आणि अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
रिपोर्टनुसार, इम्रान खान यांना 22 दिवसांपासून पूर्णपणे वेगळे ठेवण्यात आले आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही, गेल्या 3 आठवड्यांपासून त्यांच्या कुटुंबीयांची भेट निश्चित करण्यात आलेली नाही.
इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांना बलुचिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या व्हेरिफाईड ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून बळ मिळाले. एका पोस्टमध्ये त्यांनी ‘इम्रान खान यांची असीम मुनीर आणि त्यांच्या आयएसआय प्रशासनाने हत्या केली,’ असा थेट आरोप केला. ‘अफगाणिस्तान टाईम्स’ या वृत्तसंस्थेच्या अधिकृत खात्यानेही ‘इम्रान खान यांना रहस्यमय पद्धतीने मारले गेले असून, त्यांचे पार्थिव तुरुंगातून हलवण्यात आले आहे,’ असे वृत्त दिले.
🚨#BreakingNews:
— Afghanistan Times (@TimesAFg1) November 26, 2025
A credible source from Pakistan has confirmed to Afghanistan Times that PTI Chairman Imran Khan has allegedly been mysteriously killed, and his body has been moved out of the prison.#PTI #AfghanistanAndPakistan pic.twitter.com/FpJSrksXHA
या सर्व अफवांवर आतापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण जारी झालेले नाही, ज्यामुळे त्यांच्या तब्येतीबद्दलची चिंता वाढली आहे.









