अतिवृष्टी आणि चक्रीवादळाचा अचूक अंदाज! नवीन हवामान अंदाज प्रणाली सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा

Bharat Forecasting System

Bharat Forecasting System | भारतात हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करणे अनेकदा कठीण असते. भारताच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये पाऊस, वादळाचा अचूक अंदाज बांधता येत नाही. मात्र, आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जगातील सर्वात अचूक आणि स्वदेशी बनावटीची हवामान अंदाज प्रणाली कार्यान्वित केली आहे. सरकारने ‘भारत फोरकास्टिंग सिस्टीम’ (Bharat Forecasting System) नावाने आधुनिक हवामान अंदाज प्रणाली सुरू केली आहे.

ही सुधारित प्रणाली अवघ्या 6 किलोमीटर परिघात हवामानाचा अचूक अंदाज देऊ शकते, जी सध्या वापरल्या जाणाऱ्या 12 किलोमीटर परिघाच्या प्रणालीपेक्षा मोठी सुधारणा मानली जाते.

सध्या ‘भारत फोरकास्टिंग प्रणाली’ (Bharat Forecast System) गाव आणि पंचायत स्तरापर्यंत हवामान अंदाज देऊ शकते आणि तिच्या अंदाजात सुमारे 64 टक्के सुधारणा झाली आहे. ही प्रणाली विशेषतः अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 30 टक्क्यांपर्यंत अधिक अचूकता प्रदान करत आहे. तसेच चक्रीवादळांच्या मार्गांचा अंदाज लावण्यामध्येही आता लक्षणीय प्रगती झाली आहे.

ही नवी प्रणाली पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेने (Indian Institute of Tropical Meteorology) विकसित केली असून, ती आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून देशभर राबवली जाणार आहे. नवीन मॉडेल आता अल्प आणि दीर्घ कालावधीसाठी अधिक अचूक हवामान अंदाज देणार आहे.

पूर्वी IMD कडून 23 किलोमीटर परिघात हवामान मॉडेल वापरले जात होते, जे पुढे 12 किलोमीटर करण्यात आले. आता, उच्च-स्तरीय संगणक प्रणाली आणि उपग्रह प्रतिमा (satellite imagery) यांच्या मदतीने हे अंतर आणखी कमी करून 6 किलोमीटर करण्यात आले आहे.

ही प्रणाली केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते IMD ला हस्तांतरित करण्यात आली. यावेळी IITM-पुणेचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव यांनी सांगितले की, आधीच्या प्रणालींना विशिष्ट क्षेत्रासाठी अंदाज तयार करायला 12-14 तास लागत होते, पण आता ‘मिशन मौसम’ अंतर्गत फक्त 4-6 तासांमध्ये अचूक अंदाज वर्तवता येतो.

IMD चे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, ही प्रणाली सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नवी प्रणाली यशस्वीपणे समाविष्ट केल्यामुळे, भारत हा रिअल टाइममध्ये उच्च रिझोल्यूशनवर जागतिक हवामान मॉडेल चालवणारा एकमेव देश ठरला आहे. ही प्रणाली 2022 पासून चाचणी टप्प्यावर होती आणि आता ती पूर्णतः कार्यरत झाली आहे.