Iran Ship : जागतिक स्तरावर समुद्रामध्ये तणावाचे वातावरण असताना भारताने इराणला मदतीचा हात दिला आहे. तांत्रिक बिघाडामुळे संकटात सापडलेल्या इराणच्या ‘आयआरआयएस लावन’ (IRIS Lavan) या जहाजाला भारताने कोचीमध्ये आपत्कालीन डॉकिंगची परवानगी दिली असून त्यावरील १८३ खलाशांच्या राहण्याची सोय केली आहे.
नेमकी घटना काय?
इराणच्या या जहाजामध्ये अचानक गंभीर तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. २८ फेब्रुवारी रोजी इराणकडून या संदर्भात विनंती प्राप्त झाल्यानंतर भारताने १ मार्च रोजी तातडीने या जहाजाला कोचीमध्ये येण्याची परवानगी दिली. हे जहाज ४ मार्च रोजी कोची बंदरात दाखल झाले. हे जहाज आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूसाठी या भागात आले होते.
तणावाच्या पार्श्वभूमीवर मदत
विशेष म्हणजे, ही मदत अशा वेळी केली गेली जेव्हा काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची युद्धनौका ‘आयआरआयएस डेना’ (IRIS Dena) बुडवली होती. त्या हल्ल्यात ८७ इराणी खलाशांचा मृत्यू झाला होता.
तो तणाव निर्माण होण्याच्या काही दिवस आधीच ‘आयआरआयएस लावन’ बाबत भारताकडे विनंती करण्यात आली होती. ‘आयआरआयएस डेना’ हे जहाज भारतात आयोजित ‘मिलन’ या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन परतत असताना त्यावर हल्ला झाला होता.
खलाशांच्या निवासाची व्यवस्था
कोचीमध्ये दाखल झालेल्या ‘आयआरआयएस लावन’ मधील १८३ खलाशांना भारतीय नौदलाच्या कोची येथील तळावर निवारा देण्यात आला आहे. या खलाशांची देखभाल आणि जहाजाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सहकार्य भारत करत आहे. समुद्रात उद्भवलेल्या आणीबाणीच्या काळात शेजारील राष्ट्रांना मदत करण्याच्या भारताच्या धोरणाचे हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.










