लंडन – भारत (India) आणि ब्रिटनने (Britain) आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केल्या. या करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापार दरवर्षी ३ लाख कोटी रुपयांनी वाढणार आहे. २०२० मध्ये युरोपियन (European)युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने एखाद्या देशासोबत केलेला हा सर्वात मोठा व्यापार करार आहे. दोन्ही देशात या काररासाठी गेली तीन वर्षे वाटाघाटी सुरू होत्या.
भारताचे पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि ब्रिटनचे पंतप्रधान ब्रिटिश किर स्टार्मर (British Kir Starmer) यांच्यात लंडनमध्ये झालेल्या चर्चेनंतर भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षर्या केल्या. स्टार्मर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, आज आपल्या दोन्ही राष्ट्रांनी व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे, याचा मला आनंद आहे. दोन लोकशाही आणि बड्या अर्थव्यवस्थांमधील या करारामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जागतिक स्थैर्य आणि समृद्धीच्या दृष्टीनेही हा करार महत्त्वाचा आहे. एआय (AI), क्रिटिकल मिनरल (Critical minerals), सेमी कंडक्टर (semiconductors), सायबर सिक्युरिटी (Cyber Security), शिक्षण (education), तंत्रज्ञान (technology), हवामान (climate), संशोधन (research), आरोग्य (health)अशा अनेक क्षेत्रांना या कराराचा फायदा होणार आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर म्हणाले की, पंतप्रधान मोदींसोबत होणारा ऐतिहासिक करार ब्रिटनमध्ये नोकऱ्या आणि विकासाच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरेल.
या करारामुळे भारतातून ब्रिटनला होणाऱ्या ९९ टक्के निर्यातीवरील करसवलती मिळतील. यामुळे भारतातून ब्रिटनला पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणावर कमी केला जाईल किंवा पूर्णपणे रद्द केला जाईल. जेनेरिक औषधे, भारतीय कोळंबी, चामडे, माशांचे खाद्य, मसाले, तयार खाद्य, फळे, भाज्या, चपला यावरील कर पूर्णपणे रद्द केला जाईल. याशिवाय भारतीय कापड, औषधे, इंजिनीयरिंग उत्पादने, रत्ने, दागिने, इलेक्ट्रिक कार यांना करसवलत मिळेल. त्यामुळे या वस्तू ब्रिटनमध्ये स्वस्तात विकल्या जातील. मात्र, दुग्ध उत्पादने, सफरचंद, ओट्स, खाद्य तेल यांचा या करारात समावेश करण्यात आलेला नाही.
या करारामुळे भारतात ब्रिटनमधून आयात होणारे ब्रँडेड कपडे, फॅशन उत्पादने, घरगुती वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक यंत्रसामग्री, सौंदर्य प्रसाधन, साल्मन मासे, चॉकलेट (Chocolate), बिस्किट (Biscuit) आणि वैद्यकीय उपकरणे भारतात स्वस्त होतील. स्कॉच व्हिस्कीवर (Scotch whiskey) भारतात १५० टक्के कर आहे, तो ७५ टक्के इतका होईल. पुढील १० वर्षांत तो ४० टक्क्यांवर आणण्यात येईल. आयात केलेल्या लक्झरी कारवरील १०० टक्के करही १० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल.