India Stealth Fighter Jet | चीन पाकिस्तानला स्टेल्थ फायटर जेट्स (stealth fighter jets) पुरवण्याची योजना झपाट्याने पुढे नेत आहे. यामुळे भारताच्या पश्चिम सीमेवरील हवाई संतुलन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर भारताने स्वतःचे स्टेल्थ फायटर विमान (stealth aircraft) बनवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेला अधिकृत मंजुरी दिली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी देशाच्या पहिल्या स्वदेशी स्टेल्थ फायटर जेट प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे दुहेरी इंजिनचे, पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमान असेल. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी सरकारी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (Aeronautical Development Agency) करणार असून, लवकरच सार्वजनिक आणि खाजगी संरक्षण कंपन्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावले जाईल. सुरुवातीला कंपन्या प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी आपली स्वारस्यता नोंदवतील.
संरक्षण मंत्रालयानुसार, संपूर्ण प्रकल्प पूर्णतः देशांतर्गत कंपन्यांमार्फत राबवण्यात येणार असून, स्वतंत्रपणे किंवा संयुक्त उपक्रमाच्या स्वरूपात खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रातील कंपन्यांना बोली लावण्याची मुभा दिली जाईल. मार्च 2025 मध्ये एका उच्चस्तरीय समितीने खाजगी सहभागाची शिफारस केली होती, जेणेकरून सरकारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) वरील उत्पादन दबाव कमी करता येईल.
HAL ला आधीच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस प्रकल्पात विलंबाचा सामना करावा लागत आहे. HAL ने याला अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिककडून जेट इंजिनच्या पुरवठ्यातील उशीर जबाबदार धरला आहे.
दरम्यान, भारताचे संरक्षण संशोधन संस्थान DRDO आपले स्वदेशी GTRE GTX-35VS कावेरी इंजिन प्रकल्पही विकसित करत आहे. हे इंजिन विशेषतः LCA तेजससाठी तयार केले जात असून सध्या प्रगतीपथावर आहे.
भारताच्या सध्याच्या हवाई दलात मुख्यत्वे रशियन आणि फ्रेंच लढाऊ विमाने वापरली जातात. स्क्वॉड्रनची संख्या सध्या फक्त 31 आहे, जे मंजूर 42 स्क्वॉड्रनच्या तुलनेत खूपच कमी आहे.
दुसरीकडे, चीनने 6व्या पिढीतील लढाऊ विमान विकसित केले असून त्याची चाचणीही केली आहे. हे ‘J-36’ नावाचे विमान चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने बनवले आहे. चीन पाकिस्तानच्या मदतीसाठी सज्ज असून, पाकिस्तानकडे आधीच J-10 फायटर जेट आहे. आता बीजिंगने त्याला नवीनस्टेल्थ फायटर जेट – शेनयांग J-35 दिल्याची माहिती समोर आली आहे.