Boycott Turkey | पाकिस्तानला पाठिंबा देणे भोवले, भारतीयांचा तुर्कीवर बहिष्कार; पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

Indians Boycott Turkey |

Indians Boycott Turkey | भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने तुर्की (Turkey) आणि अझरबैजानला (Azerbaijan) भारतात मोठा विरोध सुरू झाला आहे. सोशल मीडियावर या दोन्ही देशांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन होत असून अनेक प्रमुख ट्रॅव्हल कंपन्यांनीही या देशांसाठी बुकिंग थांबवले आहे.

तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या कारवाईचा निषेध करत “पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारे” आक्रमण झाल्याचे म्हटले, तर अझरबैजानने इस्लामाबादला (Islamabad) पाठिंबा देणारे निवेदन जारी केले. दोघांनीही संयम बाळगण्याचे आवाहन केले, मात्र भारतातील सोशल मीडिया यूजर्स याचा तीव्र निषेध केला आहे.

EaseMyTrip, Ixigo, WanderOn, Travomint, Cox & Kings आणि Go Homestays या ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानसाठी बुकिंग रद्द केल्याचे जाहीर केले आहे. EaseMyTrip चे अध्यक्ष निशांत पिट्टी यांनी प्रवाशांना अत्यावश्यक असेल तरच या देशांना भेट देण्याचा सल्ला दिला आहे. Ixigo ने तुर्की, अझरबैजान आणि चीनसाठी सर्व बुकिंग निलंबित केली आहेत. Go Homestays ने तर Turkish Airlines सोबतची भागीदारी संपवली आहे.

आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 330,000 भारतीयांनी तुर्कीला भेट दिली होती, तर अझरबैजानमध्ये गेल्या वर्षी 243,589 भारतीय प्रवासी गेले. भारत हा अझरबैजानसाठी चौथा सर्वात मोठा टुरिस्ट मार्केट होता. Booking.com च्या ट्रॅव्हल रिपोर्टनुसार, Gabala आणि Baku ही शहरे 2025 साठी टॉप 10 ट्रेंडिंग गंतव्यांमध्ये होती.

मात्र आता या देशांवरील बहिष्कारामुळे त्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. WanderOn चे CEO गोविंद गौर यांनी सांगितले की, भारतातून या देशांसाठी 50 टक्क्यांहून अधिक बुकिंग कमी होण्याची शक्यता आहे. चीननंतर भारत हे या गंतव्यांसाठी महत्त्वाचे मार्केट असल्याने हॉटेल्स, एअरलाइन्स आणि स्थानिक पर्यटन सेवा यांवर परिणाम होईल.

राजकीय नेत्यांनीही या देशांचा निषेध केला आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तुर्कीवर टीका करत म्हटले, “भारतीय अशा देशांवर पैसा खर्च करणार नाहीत जे पैसे पाकिस्तानला शस्त्रे देण्यासाठी वापरतात.” काँग्रेस आमदार कुलदीप राठौर यांनी तुर्कीच्या आयातीवर बंदीची मागणी केली. माजी पोलीस अधिकारी प्रकाश सिंह यांनी भारताने तुर्कीशी असलेले मार्ग-वाटपाचे करार रद्द करावेत, असे सुचवले आहे.

भारताचा हा बहिष्कार किती खोलवर परिणाम करतो हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल, मात्र या बॉयकॉट मोहिमेमुळे तुर्की आणि अझरबैजानच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निश्चित आहे.