India Expels Another Pak High Commission Official | भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याला “त्याच्या अधिकृत दर्जाशी सुसंगत नसलेल्या कृत्यांमध्ये सामील” असल्याच्या कारणावरून ‘अवांछित व्यक्ती’ (persona non grata) घोषित करून 24 तासांत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी 13 मे रोजी अशाच प्रकारच्या आरोपांवरून एका पाकिस्तानी अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच्यावर भारतामध्ये कथित हेरगिरी केल्याचा आरोप होता.
ही कारवाई भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरकेलेल्या हवाई आणि सर्जिकल कारवायांनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष देखील झाला होता.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, “पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याची भारतात त्याच्या अधिकृत स्थानाचा गैरवापर केल्यामुळे हकालपट्टी करण्यात येत आहे.” मात्र, या अधिकाऱ्यावरील विशिष्ट आरोपांचा तपशील देण्यात आलेला नाही.
नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या प्रभारी अधिकाऱ्याला भारत सरकारने बजावले आहे की, कोणत्याही पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करू नये.
या पार्श्वभूमीवर, पाकिस्ताननेही इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला “विशेषाधिकारप्राप्त दर्जाशी विसंगत वर्तन” केल्याचा आरोप करत हकालपट्टी केली आहे. त्यालाही 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत.
दरम्यान, भारताने 6 आणि 7 मे दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवून जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करून पायाभूत सुविधा नष्ट केल्या.
या कारवायांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय तणाव पुन्हा वाढला. 10 मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती.