Rafale Deal: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात संरक्षण क्षेत्रातील एका ऐतिहासिक कराराला वेग आला आहे. भारताने आपल्या हवाई दलासाठी ११४ अतिरिक्त राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची योजना आखली असून, या ४० अब्ज डॉलर्सच्या व्यवहाराला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. या कराराचा मोठा भाग ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतातच तयार केला जाणार आहे, ज्यामुळे देशाच्या संरक्षण उत्पादनाला मोठी चालना मिळेल.
हवाई दलासाठी का आहे महत्त्वाचे?
भारतीय हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या २९ तुकड्या आहेत, तर मंजूर संख्या ४२ असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, पाकिस्तानकडे २५ आणि चीनकडे ६० हून अधिक अत्याधुनिक तुकड्या आहेत. ही तफावत भरून काढण्यासाठी राफेलची निवड करण्यात आली आहे.
मे २०२५ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेत राफेलने आपली क्षमता सिद्ध केली असून, सुखोई-३० एमकेआय आणि नेत्रा यंत्रणेसोबत त्याचे नेटवर्किंग अत्यंत प्रभावी ठरले आहे.
राफेल विरुद्ध एफ-१६, जेएफ-१७ आणि जे-१०सी
आशियाई आकाशात वर्चस्व राखण्यासाठी राफेलची तुलना प्रतिस्पर्ध्यांशी केली जाते:
- Lockheed Martin F-16 (पाकिस्तान): अमेरिकन बनावटीचे हे विमान वेगात राफेलपेक्षा थोडे पुढे असले तरी, राफेलची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता २४.५ टन आहे, जी एफ-१६ पेक्षा (२१.७ टन) जास्त आहे. राफेलमधील मेटेओर क्षेपणास्त्रे ही एफ-१६ च्या प्रणालीपेक्षा अधिक घातक आहेत.
- JF-17 Thunder (पाकिस्तान-चीन): हे एक हलके आणि स्वस्त विमान आहे. २०२५ च्या संघर्षात या विमानांच्या तांत्रिक मर्यादा उघड झाल्या होत्या. राफेलच्या अत्याधुनिक रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीसमोर हे विमान तग धरू शकत नाही.
- Chengdu J-10C (चीन-पाकिस्तान): हे राफेलला काही अंशी टक्कर देऊ शकणारे ४.५ पिढीचे विमान आहे. याची हालचाल करण्याची क्षमता चांगली असली तरी, राफेलच्या दोन इंजिनांची विश्वासार्हता आणि त्याच्याकडील प्रगत रडार यंत्रणा (AESA) यामुळे भारतीय हवाई दलाचे पारडे जड राहते.
राफेलची ताकद: भारतासाठी खास कस्टमायझेशन
भारताकडे असलेल्या राफेलमध्ये खास बदल करण्यात आले आहेत. यात ‘मिटिओर’ सारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ‘स्कॅल्प’ क्रूझ क्षेपणास्त्र आणि अचूक हल्ल्यासाठी ‘हॅमर’ शस्त्रांचा समावेश आहे. तसेच, शत्रूचे रडार जाम करण्याची क्षमता आणि प्रगत दळणवळण यंत्रणेमुळे राफेल सध्या जगातील सर्वात प्रगत विमानांपैकी एक मानले जाते.
या नवीन ११४ विमानांच्या आगमनानंतर, भारताचे सागरी आणि हवाई सीमांवरील वर्चस्व अधिक अभेद्य होणार आहे. विशेष म्हणजे नौदलासाठीही २६ राफेल-एम विमानांची खरेदी आयएनएस विक्रांतसाठी आधीच निश्चित झाली आहे.











