India Job Growth: भारताच्या रोजगार क्षेत्रात गेल्या 6 वर्षांत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाच्या कार्यक्षम मनुष्यबळात तब्बल 16 कोटी 83 लाख नोकऱ्यांची भर पडली आहे.
बेरोजगारी दरात मोठी घट
2017-18 मध्ये देशातील एकूण रोजगार 47 कोटी 50 लाख होता, जो 2023-24 मध्ये वाढून 64 कोटी 33 लाख झाला आहे. या सहा वर्षांच्या कालावधीत, बेरोजगारी दरात लक्षणीय घट झाली आहे. बेरोजगारी दर 2017-18 मध्ये 6% होता, तो 2023-24 मध्ये कमी होऊन 3.2% (3.2 percent) वर आला आहे.
मंत्रालयाच्या मते, ही आकडेवारी दर्शवते की कार्यक्षम मनुष्यबळ उत्पादक रोजगारात अधिक प्रभावीपणे सामावून घेतले जात आहे. त्याचबरोबर युवकांमधील बेरोजगारीचा दर (Youth Unemployment Rate) देखील 17.8% वरून 10.2% वर आला आहे, जो 13.3% च्या जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.
महिला आणि स्टार्टअप्सची निर्णायक भूमिका
या रोजगार वाढीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. गेल्या 7 वर्षांत 1 कोटी 56 लाखांहून अधिक महिला औपचारिक क्षेत्रात सामील झाल्या आहेत.
रोजगाराच्या पद्धतीतही बदल झाला असून, स्वयंरोजगाराचे प्रमाण 2023-24 मध्ये वाढून 58.4% झाले आहे. या वाढीसाठी स्टार्टअप्स आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स हे प्रमुख घटक ठरले आहेत.
भारतातील 2 लाखांहून अधिक DPIIT-मान्यताप्राप्त स्टार्टअप्सने 17 लाखाहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती केली आहे आणि 2025 पर्यंत देशात 118 युनिकॉर्न्स आहेत.
याशिवाय, स्किल इंडिया, रोजगार मेळावे, पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Scheme), मनरेगा (MGNREGA), पीएम विकसित भारत रोजगार योजना आणि लखपती दीदी योजना यांसारख्या सरकारी योजनांनी या वाढीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.
हे देखील वाचा – फोनचा चार्जर बनला महत्त्वाचा पुरावा! पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींच्या साथीदाराला ‘अशी’ झाली अटक