India Nuclear Milestone: भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. तामिळनाडूतील कल्पक्कम येथे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या ‘प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ने (PFBR) आपले पहिले यश (Criticality) साध्य केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत आता जगातील अशा निवडक देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे, ज्यांच्याकडे प्रगत अणुतंत्रज्ञान उपलब्ध आहे.
पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “भारत आपल्या नागरी अणू प्रवासात एक निर्णायक पाऊल टाकत आहे. देशाच्या तीन टप्प्यातील अणू कार्यक्रमाचा हा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे.” हा प्रगत रिअॅक्टर जेवढे इंधन वापरतो, त्यापेक्षा जास्त इंधन तयार करण्याची क्षमता ठेवतो, जे भारताच्या वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी सामर्थ्याचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जगातील दुसरा देश ठरणार भारत
५०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला हा रिअॅक्टर ‘भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड’ (BHAVINI) मार्फत चालवला जात आहे. रशियानंतर अशा प्रकारचा व्यावसायिक ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ असणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरणार आहे. ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य करणे म्हणजे रिअॅक्टरमध्ये अणुऊर्जेची साखळी प्रक्रिया स्वतःहून सुरू होणे, जे वीज निर्मितीपूर्वीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ
हा प्रकल्प पूर्णपणे भारतीय उद्योगांच्या मदतीने उभारण्यात आला आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या आणि अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (MSME) योगदान आहे. यामुळे अणू तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत आता स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भविष्यात भारताकडे असलेल्या थोरियमच्या अफाट साठ्याचा वापर करून वीज निर्मिती करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश मानले जात आहे.
भारताची ही प्रगत अणू तंत्रज्ञान झेप केवळ ऊर्जा सुरक्षाच नाही, तर स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरेल.












