India Monsoon | भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या सुधारित अंदाजानुसार, 2025 मध्ये देशात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 106% इतका असण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये दिलेला 105% चा अंदाज आता वाढवण्यात आला आहे.
देशातील दीर्घकालीन सरासरी (Long Period Average ) पर्जन्यमान 868.6 मिमी आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले की, जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीत देशभरात सामान्य ते जास्त पाऊस असेल.
प्रदेशानुसार, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा जास्त (>106 टक्के LPA), उत्तर पश्चिम भारतात सरासरी (92-108 टक्के LPA) आणि उत्तर पूर्व भारतात सरासरीपेक्षा कमी (<94 टक्के LPA) पाऊस अपेक्षित आहे.
IMD च्या निवेदनानुसार, उत्तर भारत आणि उत्तर पूर्वेकडील काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांत जास्त पावसाची शक्यता आहे.
जूनमध्येही जास्त पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून 2025 मध्ये देशातील मासिक पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त (>108% LPA) असण्याची शक्यता आहे. केवळ दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग, उत्तर पश्चिम भारत आणि उत्तर पूर्व भारतातील काही भाग वगळता इतरत्र समाधानकारक पाऊस होईल.
यंदा मान्सूनची लवकर एन्ट्री
नैऋत्य मान्सूनने यंदा 24 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला असून तो नेहमीच्या 1 जूनच्या तुलनेत आठवडाभर आधी दाखल झाला आहे. 2009 नंतर ही सर्वात लवकर झालेली मान्सूनची सुरुवात आहे. याआधी 2022 आणि 2024 मध्ये अनुक्रमे 29 आणि 30 मे रोजी मान्सून दाखल झाला होता.
पुढील 2-3 दिवसांत हा मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम तसेच उत्तर पूर्व भारताच्या इतर भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस कृषी क्षेत्रासाठी फायदेशीर असला, तरी पूर, वाहतूक अडथळे, सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या व परिसंस्थेच्या नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. या वाढीव पावसामुळे खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेरणी करू शकतील.