Most Polluted City : जगातील हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेणाऱ्या ‘आयक्यू एअर’ (IQAir) या संस्थेच्या 2025 च्या अहवालाने भारताच्या पर्यावरणाचे विदारक चित्र समोर आणले आहे. या अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जवळील लोणी हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.
स्वच्छ हवेसाठी चाललेली लढाई भारत हरत असल्याचेच या आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, ही भारतीयांसाठी अत्यंत भूषणावह नसून चिंतेची बाब आहे.
लोणी: प्रदूषणाचे जीवघेणे केंद्र
लोणी शहरात हवेतील अतिसूक्ष्म कणांचे (PM2.5) प्रमाण सरासरी 112.5 मायक्रोग्राम प्रति घनमीटर नोंदवले गेले आहे. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवून दिलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल 22 पटीने जास्त आहे. हवेतील हे सूक्ष्म कण इतके घातक असतात की ते थेट फुफ्फुसात आणि रक्ताभिसरणात मिसळून दमा, हृदयविकार आणि कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करतात.
प्रदूषणाची विळखा का वाढतोय?
लोणी आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्रात औद्योगिक वसाहती, वीटभट्ट्या आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ आहे. याशिवाय, हिवाळ्यात पंजाब आणि हरियाणामध्ये शेतातील पालापाचोळा जाळल्यामुळे उत्तर भारतातील प्रदूषणात 60 टक्क्यांपर्यंत वाढ होते. थंड हवा जमिनीलगत स्थिर राहिल्यामुळे हे विषारी वायू बाहेर पडू शकत नाहीत आणि शहराचे रूपांतर एका ‘गॅस चेंबर’मध्ये होते.
भारताची स्थिती विदारक
प्रदूषणाच्या या जागतिक शर्यतीत भारताची पीछेहाट सुरूच आहे:
- बर्नीहाट (मेघालय): निसर्गरम्य मेघालयातील हे शहर प्रदूषणाच्या यादीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- दिल्ली: जागतिक स्तरावर दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वात प्रदूषित राजधानीच्या शहरांमध्ये दिल्लीने पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले आहे.
- देशाचे रँकिंग: जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर असून येथील हवेचा दर्जा मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक स्तरावर पोहोचला आहे.
या अहवालावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्या देशात स्वच्छ हवा मिळणे आता दुर्मिळ झाले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे कोट्यवधी भारतीयांचे आयुष्य धोक्यात आले आहे.











