ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ घोषणेनंतर भारताचा मोठा निर्णय, अमेरिकेकडून F-35 जेट्स खरेदी करणार नाही

F-35 Fighter Jets

F-35 Fighter Jets: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, त्यांनी भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचे म्हटले होते. आता यावर भारताने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

भारताने अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ लढाऊ विमानांची (F-35 Fighter Jets) खरेदी ऑफर नाकारल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा इशारा दिल्याने दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे शुल्क 7 ऑगस्टपासून लागू होणार आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, आता भारत अमेरिकेकडून F-35 स्टेल्थ लढाऊ विमाने खरेदी करणार नाही. याआधी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ट्रम्प यांनी ही विमाने खरेदी करण्याची ऑफर दिली होती.

अमेरिकेने द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी ही ऑफर दिली होती, पण भारताचा भर महागड्या विमानांच्या खरेदीऐवजी संयुक्त डिझाइन आणि देशांतर्गत उत्पादनावर आहे. या निर्णयाने संरक्षण धोरणात मोठा बदल दिसत आहे.

व्यापार तणाव

25 टक्के शुल्काच्या घोषणेमुळे दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. केंद्र सरकारने तातडीचा प्रत्युत्तर टाळला असला तरी व्यापार तूट कमी करण्यासाठी नैसर्गिक वायू, सोने आणि दळणवळण उपकरणे आयात वाढवण्याचा विचार सुरू आहे. संरक्षण खरेदीचा सध्या विचार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आत्मनिर्भरतेला प्राधान्य

F-35 हे जगातील प्रगत विमानांपैकी एक असून, चीनच्या लष्करी वाढीला तोंड देण्यासाठी अमेरिकेने ही ऑफर दिली होती. पण भारताने सध्या तरीही ही विमाने खरेदी करण्याचा मानस नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार आता मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशीकरण आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर भर देणार आहे.