India vs Pakistan match: पहलगाम हल्ला (Pahalgam terror attack) आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला आज देशभरातून जोरदार विरोध केला गेला. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबाने जाहीरपणे या सामन्याला विरोध केला. उबाठाने या सामन्याविरोधात महाराष्ट्रात ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केले. तर उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे या सामन्याच्या निषेधार्थ आंदोलने झाली. अनेक ठिकाणी टीव्हीची प्रतीके फोडून बॅट-स्टम्प जाळण्यात आल्या.
हरभजन सिंग, केदार जाधव या क्रिकेटपटूंनी या सामन्याला विरोध केला. सोशल मीडियावर ‘बॉयकॉट इंडिया व्हर्सेस पाकिस्तान’ हे ट्रेंडिंग होते. भारतात होणाऱ्या या विरोधाच्या दबावामुळे आज दुबईत सामन्याच्या आधी होणारी दोन्ही कप्तानांची पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. मात्र या सर्व विरोधानंतरही सामना खेळण्यात आला.
एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्व प्रकारचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्याही क्षेत्रात पाकिस्तानशी संबंध न ठेवण्याची भूमिका भारताने त्यावेळी घेतली होती. पाकिस्तानशी युद्ध संपलेले नाही असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते. पण आशिया कपमध्ये भारत-पाक सामन्याची घोषणा झाल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने या सामन्यातून माघार घेतली नाही. हा सामना खेळला नाही तर स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ. यामुळे खेळावेच लागेल, अशी भूमिका सरकारने व क्रिकेट संघाने घेतली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह क्रिकेटप्रेमींमध्येही संताप पसरला. या सामन्यावरून काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या सामन्यावर बहिष्कार टाका, टीव्हीवरही सामना पाहू नका असे आवाहन केले होते. या सामन्याविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
यानुसार आज मुंबईतील करी रोड, सायन-प्रतीक्षानगर, दादर, बोरिवली स्थानक, कांदिवली, कांजूरमार्ग आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुण्यातील लाल महाल चौक, पंढरपूर, गोंदिया येथे उबाठाने आंदोलन केले. कुंकू आणि बांगड्यांचे पाकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्यात येणार आहे. यासाठी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन येथे खासदार अनिल देसाई यांच्याकडे कुंकू, सौभाग्याची ओटी आणि सिंदूर सुपूर्द केले. करी रोड येथे उपनेत्या किशोरी पेडणेकर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ठाण्यात राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.
तर यवतमाळमध्ये वणीत जय शहा (भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष) यांनी मुर्दाबादच्या घोषणा देत टीव्ही, स्टम्प, बॅट जाळले. उबाठाने या सामन्याचे थेट प्रसारण करणाऱ्या सोनी पिक्चर्सला पत्र देऊन सामना न दाखवण्याची मागणी केली. मुंबईतील आमदार अनिल परब आणि कोल्हापुरातील उपनेते संजय पवार यांनी हॉटेल-मालकांना सामना दाखवू नये, अन्यथा टीव्ही फोडले जातील, असा थेट इशारा दिला. डोंबिवली पूर्व येथे मनसे आणि उबाठाने एकत्र आंदोलन केले. पहलगाममध्ये हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला होता. त्यांना आदरांजली म्हणून डोंबिवलीकरांनी आजचा सामना न पाहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत भारत-पाकिस्तान सामन्याचा तीव्र निषेध नोंदवला. अभिनेते नाना पाटेकर यांनीही आपल्या लोकांचे रक्त सांडले आहे. त्यामुळे पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यात काय अर्थ आहे? असा सवाल केला.
आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पुतळा जाळला. पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. समाज माध्यमांवर अनेकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांचे मिम तयार केले. बॉयकॉट इंडिया-पाकिस्तान मॅच हा हॅशटॅग सर्वाधिक वापरत सामना रद्द करा, अशी मागणी अनेकांनी केली. माजी क्रिकेटपटू हरभजनसिंगने पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार सध्या तरी नको, अशी भूमिका मांडली. तर माजी क्रिकेटपटू केदार जाधव यानेही भारत-पाकिस्तान सामना नको, असे मत व्यक्त केले. माजी खेळाडू सुनील गावस्कर म्हणाले की, एखाद्या देशाविरुद्ध खेळायचे की नाही, हा निर्णय सरकारचा असतो. सरकार जो काही निर्णय घेईल तो बीसीसीआय आणि खेळाडूंना स्वीकारावा लागतो. या प्रकरणात मी वैयक्तिकरित्या काय विचार करतो, याने काही फरक पडत नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्बिवेदी म्हणाल्या की, पाकिस्तान या सामन्यातून मिळालेल्या पैशांचा वापर दहशतवादासाठी करील, ते पुन्हा आपल्यावर हल्ला करतील. 26 कुटुंबांनी जीव गमावलेल्या जवानांच्या बलिदानाचे महत्त्व बीसीसीआयला नाही का? त्यांच्या घरातून कोणीही शहीद झाले नसल्यामुळे त्यांना फरक पडत नाही का?
पेहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी यांनी आज होणारा भारत आणि पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी केली. आसावरी म्हणाली की, ज्या देशाचे दहशतवादी येऊन आपल्या लोकांना मारून जातात, ज्या देशासोबत आपले इतक्या वर्षांपासून वैर आहे, आपले कितीतरी जवान, सामान्य लोक इतक्या वर्षात दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. तरीसुद्धा तुम्ही त्या देशाशी सामना खेळता. हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या, त्या आता कुठे गेल्या? पहलगाम हल्ल्यात वडील शुभम यतिश परमार आणि भाऊ किरण यांना गमावणारे गुजरातच्या भावनगर येथील सावन परमार म्हणाले की, पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसावा. जर तुम्हाला सामना खेळायचे असेल तर माझ्या 16 वर्षांच्या भावाला परत आणा. त्याला अनेक गोळ्या घालण्यात आल्या. ऑपरेशन सिंदूर आता निरुपयोगी वाटत आहे.
पहलगाम हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोरे या तिघांचा मृत्यू झाला होता. संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले म्हणाला की, आधी मला वाटायचे की राजकारण आणि खेळ वेगळे असावे. पण आता तसे वाटत नाही. कारण हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहे. भारत-पाक सामना खेळायला नको. कारण पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. पाकिस्तानला सर्व बाजूंनी आपण एकटे पाडले पाहिजे.
शहिदांचे कुटुंबीय आक्रोश करीत असतानाच उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा या विषयावरून भाजपावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मोदी-शहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या 26 लोकांच्या बायकांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले गेले. मोदींनी छाती पिटण्याचा कार्यक्रम केला. भारताने याआधी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. पण जय शहा यांना यात खूप रस आहे. मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजपा के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते है? हा कोणता पैशाचा खेळ आहे?
या सामन्याला होत असलेल्या विरोधानंतर बीसीसीआयकडून आज पहिली प्रतिक्रिया आली. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकीया म्हणाले की, पाकिस्तान विरुद्ध विजयासाठी आपले खेळाडू पूर्ण ताकदीने उतरतील असा आम्हाला विश्वास आहे. भारताला अशा संघाविरुद्ध खेळावे लागत आहे, ज्या देशाशी फारसे चांगले संबंध नाहीत. पण बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे आम्ही या सामन्याला नकार देऊ शकत नाही. पहलगाम हल्ल्यात अनेक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही सामना खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा – Asia Cup 2025: पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताने जिंकला सामना, सूर्यकुमारने विजय भारतीय लष्कराला केला समर्पित