Trump’s new claim-भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर भरमसाट आयात शुल्क लादणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी (Trump’s new claim)नवा दावा केला. ते म्हणाले की, भारत रशियाकडून तेल घेणार नाही, अशी खात्री मोदी यांनी मला दिली आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ माजली असून, राहुल गांधींनी टीका केली आहे की, मोदी ट्रम्प यांना घाबरतात.
व्हाईट हाऊस येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारले की, मलेशिया दौर्यात ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत का? यावर ट्रम्प उत्तरले की, आम्ही नक्कीच भेटू. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत. आमचे अतिशय चांगले नाते आहे. ते महान आहेत. त्यांना ट्रम्प आवडतात. आता आवडतात या शब्दाचा वेगळा अर्थ काढू नका. मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे नुकसान करू इच्छित नाही. मी अनेक वर्षांपासून भारताकडे पाहतो आहे. तो एक विलक्षण देश आहे. दरवर्षी तिथे नवीन नेते येतात. त्यातील काही महिन्यांसाठी असायचे. हे वर्षानुवर्षे घडत राहिले. आता माझे मित्र (मोदी) बर्याच काळापासून तिथे आहेत. परंतु भारत रशियाकडून तेलखरेदी करत असल्यामुळे मी नाराज होतो. आता त्यांनी मला खात्री दिली आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. ही एक मोठी गोष्ट आहे. आता आम्ही चीनलाही तेच करण्यास भाग पाडणार आहोत.
ट्रम्प यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर टीका करत लिहिले की, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरले आहेत. रशियन तेल भारत खरेदी करणार नाही हे ठरवण्याची आणि जाहीर करण्याची परवानगी ट्रम्प यांना मोदींनी दिली आहे. ट्रम्प वारंवार दुर्लक्ष करतात, तरीही मोदी त्यांना सतत अभिनंदनाचे संदेश पाठवत असतात. त्यांनी अर्थमंत्र्यांचा अमेरिका दौराही रद्द केला. मोदी इजिप्तमधील शर्म अल-शेख परिषदेला गैरहजर राहिले. ऑपरेशन सिंदूरबाबत ट्रम्प जे म्हणाले त्याचेही मोदी यांनी खंडन केले नाही.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही मोदींवर निशाणा साधत म्हटले की, 10 मे रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5.37 वाजता, भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, हे जाहीर करणारे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ हे सर्वात पहिले व्यक्ती ठरले. यानंतर ट्रम्प यांनी पाच वेगवेगळ्या देशांमध्ये एकूण 51 वेळा, आपणच शुल्क आणि द्विपक्षीय व्यापाराचा मुद्दा वापरत दबाव आणून ऑपरेशन सिंदूर थांबवले, असा दावा केला. तरीदेखील आपले पंतप्रधान गप्प बसले. आता भारत रशियाकडून तेल आयात करणार नाही, असे आश्वासन मोदींनी दिले आहे, असे ट्रम्प म्हणतात. असे वाटत आहे की, मोदींनी महत्त्वाचे निर्णय अमेरिकेकडे सोपवले आहेत. 56 इंचाची छाती आता आकसून, सुकून गेली आहे.
काँग्रेसने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देशाच्या सन्मानाची सौदेबाजी केली आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, नरेंद्र मोदी हे कमकुवत पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या वागण्यामुळे देशाचे परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त झाले आहे. स्वतःचे ‘झप्पी’वाले संबंध सुधारण्यासाठी देशाचे संबंध बिघडवू नका. ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून अधिकृत प्रतिक्रिया दिली. त्यात म्हटले की, भारत हा तेल आणि वायू यांचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. सध्याच्या अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आमची आयात धोरणे पूर्णपणे या उद्देशावर आधारित आहेत. स्थिर
ऊर्जेच्या किमती आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे हे आमच्या ऊर्जा धोरणाचे दुहेरी उद्दिष्ट आहे. अमेरिकेचा विचार केला तर, आम्ही अमेरिकेकडून अनेक वर्षांपासून आमची ऊर्जाखरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दशकात यात सातत्याने प्रगती झाली आहे. सध्याच्या प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यात रस दाखवला आहे. यावर चर्चा सुरू आहे. आता भारतीय तेल कंपन्यांना रशियाकडून हळूहळू कमी तेल आयात करण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा –
प्रदूषणाशी लढण्यासाठी दिल्ली सरकारची अनोखी योजना.. दिवाळीनंतर कृत्रिम पावसाची योजना
हिंदी फलक , चित्रपट, गाण्यांवर तामिळनाडूत बंदीचे विधेयक येणार