Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान स्थित दहशतवादी तळ उद्धवस्त केली होती. या ऑपरदेशनद्वारे भारताने जगाला लष्करी ताकद देखील दाखवून दिली होती. आता हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ फक्त 4 दिवसांत का थांबवले, याचा खुलासा केला आहे.
ए.पी. सिंग यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी तळ पूर्णपणे नष्ट करण्याचे भारताचे उद्दिष्ट साध्य झाले होते, म्हणूनच हे ऑपरेशन थांबवण्यात आले.
‘उद्दिष्ट पूर्ण झाले, मग युद्ध का सुरू ठेवायचे?’
हवाई दल प्रमुख म्हणाले की, “कोणत्याही संघर्षाची मोठी किंमत मोजावी लागते आणि त्याचा पुढील संघर्षासाठीच्या तयारीवर परिणाम होतो. सध्या रशिया-युक्रेन किंवा इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धांकडे पाहा. ती अनेक वर्षांपासून सुरू आहेत, कारण कोणीही संघर्ष संपवण्याचा विचार करत नाहीये.”
ते पुढे म्हणाले, “आमचे उद्दिष्ट दहशतवादविरोधी होते. आम्हाला त्यांच्यावर हल्ला करायचा होता आणि आम्ही तो केला. जर आमचे उद्दिष्ट पूर्ण झाले असेल, तर संघर्ष का सुरू ठेवायचा? कारण कोणत्याही संघर्षाची मोठी किंमत चुकवावी लागते. त्याचा आपल्या पुढील तयारीवर परिणाम होईल, आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि देशाच्या प्रगतीवरही परिणाम होईल.”
त्यांनी सांगितले की, “युद्ध कधी सुरू करावे आणि कधी थांबवावे, याचा धडा जगाने भारताकडून घ्यावा.”
‘ऑपरेशन सिंदूर’ काय होते?
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 मोठ्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय आणि लष्कर-ए-तोयबाचे मुरीदके मुख्यालय यांचा समावेश होता.
या हल्ल्यांमध्ये युसूफ अझर (IC-814 हायजॅकर), अबू जुंदाल (LeT मुरीदके प्रमुख) आणि 2016 च्या नगरोटा हल्ल्याच्या सूत्रधाराचा मुलगा अशा सुमारे एक डझनहून अधिक टॉप दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. या ऑपरेशनने भारताची शत्रूच्या हद्दीत अचूक आणि प्रभावी मोहीम राबवण्याची क्षमता दाखवून दिली.
हे देखील वाचा – ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर; नीरज घायवानच्या ‘Homebound’ चित्रपटाची निवड