Indian Airports Global Ranking: आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात भारताचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. ‘स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026’ च्या ताज्या क्रमवारीत भारतातील ५ विमानतळांनी जगातील सर्वोत्तम १०० विमानतळांच्या यादीत स्थान पटकावले आहे.
विशेष म्हणजे, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने (IGI) मोठी झेप घेत जागतिक स्तरावर २८ वे स्थान मिळवले आहे.
भारतीय विमानतळांची जागतिक भरारी:
1. दिल्ली विमानतळ (IGI) – जगात २८ वे: गेल्या वर्षी ३२ व्या स्थानावर असलेल्या दिल्ली विमानतळाने यंदा ४ अंकांची सुधारणा केली आहे. यासह, दिल्ली विमानतळाला सलग कित्येक वर्षे ‘भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ’ म्हणून गौरविण्यात आले आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे हे शक्य झाले आहे.
2. बेंगळुरू विमानतळ – जगात ४१ वे: बेंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४१ वे स्थान मिळवत आपली पकड मजबूत केली आहे. विशेष म्हणजे, या विमानतळाला सलग तिसऱ्या वर्षी ‘भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ’ हा बहुमान मिळाला आहे.
3. गोवा आणि मुंबईची कामगिरी: गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ६४ व्या स्थानावर पोहोचले आहे, तर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ६६ व्या क्रमांकावर आहे. या दोन्ही विमानतळांच्या सेवा आणि सुविधेमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे या क्रमवारीत दिसून येते.
चांगी विमानतळ जगात पुन्हा ‘नंबर वन’
जागतिक स्तरावर सिंगापूरच्या चांगी विमानतळाने १४ व्यांदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा मान मिळवला आहे. या विमानतळावरील ‘द ज्वेल’ धबधबा आणि तेथील इमिग्रेशन सेवा प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. चांगी पाठोपाठ सोलचे इंचेऑन आणि टोकियोचे हॅनेडा विमानतळ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतातील विमानतळांच्या या प्रगतीमुळे देशातील पायाभूत सुविधांचा विकास जागतिक दर्जाचा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, प्रवाशांची सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे भारतीय विमानतळांचा दर्जा सतत उंचावत आहे.










