Indian Army: भारताच्या शेजारील देशांकडून सीमेवरील धोका वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या (Indian Army) आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. याचाच भाग म्हणून आता लष्करात नव्या ‘रुद्र’ ब्रिगेड (Rudra Brigades) आणि ‘भैरव’ कमांडो (Bhairav Commandos) युनिट्सचा समावेश केला जाणार आहे.
भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील ऑपरेशनल ताकद वाढवण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. देशाच्या संरक्षण धोरणात मोठा बदल करत, लष्कराने ‘रुद्र’ नावाच्या सर्व-शस्त्र ब्रिगेड आणि ‘भैरव’ लाइट कमांडो बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे युनिट्स आधुनिक युद्धासाठी सज्ज असतील आणि सीमारेषेवर लष्कराला तात्काळ प्रतिसाद देण्यास सक्षम करतील.
‘रुद्र’ ब्रिगेड म्हणजे नेमकं काय?
‘रुद्र’ ब्रिगेड हे पारंपरिक एकशस्त्र ब्रिगेड्सचे रूपांतर असलेले आधुनिक लढाऊ युनिट आहे. यात पायदळ, यांत्रिक पायदळ, रणगाडे, तोफखाना, विशेष दले आणि मानवरहित हवाई यंत्रणा यांचा समावेश असेल. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले की, या सर्व घटकांच्या एकत्रीकरणामुळे ब्रिगेडची क्षमता अनेक पटींनी वाढेल.
या युनिट्समध्ये स्वतंत्र लॉजिस्टिक आणि युद्धसाहाय्य यंत्रणा देखील असेल. यामुळे कोणत्याही परिस्थितीत जलद प्रतिसाद आणि तांत्रिक सहकार्य मिळणार आहे.
‘भैरव’ लाइट कमांडो – शत्रूला धक्का देणारे विशेष युनिट
‘भैरव’ लाइट कमांडो बटालियन ही एक अत्यंत घातक विशेष दलाची युनिट असून, ती सीमारेषेवर सातत्याने धडक कारवाया करण्यास तयार असेल. हे युनिट तांत्रिकदृष्ट्या प्रगत असून त्यामध्ये आधुनिक प्रशिक्षण घेतलेले सैनिक असतील.
जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, “हे नवे युनिट केवळ यांत्रिक किंवा रणगाड्यांवर आधारित नाही, तर त्यात युद्धात मदत करणाऱ्या प्रत्येक अत्यावश्यक घटकांचा समावेश आहे.”
नवीन भरतीऐवजी विद्यमान युनिट्सचे पुनर्रचना
या योजनेंतर्गत नव्याने भरती न करता सुमारे 250 विद्यमान ब्रिगेड्सचे पुनर्रचना केली जाणार आहे. प्रत्येकी 3000 हून अधिक सैनिक असलेल्या या ब्रिगेड्समध्ये विविध लढाऊ घटकांचा समावेश केला जाईल. परिणामी, त्यांना अधिक शक्तिशाली आणि प्रभावी बनवले जाईल.
लष्कराच्या या बदलांमुळे देशाच्या सीमांची सुरक्षा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.