Shubhanshu Shukla Interacts With PM Modi | भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) पोहोचून इतिहास रचला आहे. 39 वर्षीय शुक्ला, ऍक्सिओम-4 मिशनचे पायलट, 1984 नंतर अंतराळात पोहोचणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. शनिवारी (28 जून 2025) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याशी संवाद साधला
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी शुक्ला यांना अंतराळातून भारत कसा दिसतो? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना शुक्ला म्हणाले की, “अवकाशातून भारत नकाशापेक्षा कितीतरी भव्य दिसतो!”, अशा शब्दात त्यांनी वर्णन केले.
पंतप्रधान मोदी शुक्ला यांचे अभिनंदन करत म्हणाले की, “तुमच्या नावात ‘शुभ’ आहे आणि तुमची ही यात्रा तरुणांसाठी नव्या युगाची शुभ सुरुवात आहे. तुम्ही 140 कोटी भारतीयांच्या हृदयात आहात.” त्यांनी गगनयान मिशन, स्वदेशी अंतराळ स्थानक आणि चंद्रावरील भारतीय मोहिमेची स्वप्नेही व्यक्त केली. “तुमचा अनुभव या प्रवासाचा पाया बनेल,” असे ते म्हणाले.
“आत्ता आपण बोलत असताना, 140 कोटी भारतीयांच्या भावना तुमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. तुम्ही आपल्या देशाचा झेंडा अवकाशात घेऊन गेला आहात, त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि तुमच्या मिशनसाठी शुभेच्छा देतो,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
अवकाशातील अनुभव
पंतप्रधानांच्या प्रश्नाला उत्तर देताना शुक्ला यांनी सांगितले की, ते अंतराळ स्थानकात सुरक्षित आणि ठीक आहेत आणि हा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. ते म्हणाले, “पृथ्वीपासून 400 किमीचा माझा प्रवास केवळ माझा नाही, तर संपूर्ण देशाचा आहे. लहानपणी मला कधी वाटले नव्हते की मी अंतराळवीर बनेल, पण तुमच्या नेतृत्वाखाली देशाने स्वप्ने पूर्ण करण्याची संधी दिली आहे.”
अवकाशातील परिस्थितीबद्दल बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे इथे सर्व काही वेगळे आहे आणि झोपणे हे एक मोठे आव्हान आहे. “आम्ही एक वर्ष प्रशिक्षण घेतले, पण इथे आल्यावर सर्व काही बदलले. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे इथे लहानसहान गोष्टीही वेगळ्या वाटतात. इथे झोपायला सवय होण्यासाठी थोडा वेळ लागतो.”
त्यांनी सांगितले की, सोबत गाजर का हलवा आणि आम्रस आणले होते, जे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना खायला दिले.
ग्रुप कॅप्टन शुक्ला म्हणाले की, “प्रशिक्षणादरम्यान मी खूप काही शिकलो आणि माझा हा प्रवास संपूर्ण देशासाठी एक सामूहिक यश आहे.” त्यांनी तरुणांना आवाहन केले की, “आकाशाला कधीच मर्यादा नसते.” ते पुढे म्हणाले की, “भारत वेगाने प्रगती करत आहे आणि लवकरच त्याचे स्वतःचे अंतराळ स्थानक असेल. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अवकाशातून भारताकडे पाहिले, तेव्हा तो नकाशावर दिसतो त्यापेक्षा खूपच भव्य आणि मोठा दिसत होता.”
दरम्यान, नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स ड्रॅगन यानातून 28 तासांचा प्रवास करून शुक्ला ISS वर पोहोचले. त्यांच्यासोबत अमेरिकेची पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लाओस्ज उझांस्की आणि हंगेरीचे टिबॉर कापु हे अंतराळवीर आहेत.