Shubhanshu Shukla: अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर कधी परतणार? जाणून घ्या माहिती

Shubhanshu Shukla

Shubhanshu Shukla | भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी Axiom-4 मोहिमेचा यशस्वी समारोप केला आहे. त्यांनी हा प्रवास ‘अविश्वसनीय’ आणि ‘जादुई’ असल्याचे सांगितले. निरोप समारंभात बोलताना त्यांनी सहकाऱ्यांचे आणि ISRO चे आभार मानले.

शुक्ला म्हणाले, “अंतराळातील हा प्रवास संपला असला, तरी भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचा पुढचा प्रवास लांबच आहे. पृथ्वीकडे पाहण्याचा अनुभव मला जादुई वाटला.” गेल्या अडीच आठवड्यांत त्यांनी खिडकीतून पृथ्वीवर नजर टाकली आणि आऊटचरीच उपक्रमांत सहभाग घेतला.

हिंदीत देशबांधवांशी संवाद साधताना शुक्ला म्हणाले, “आजचा भारत अंतराळात महत्त्वाकांक्षी, निडर, आत्मविश्वासपूर्ण आणि गर्वाने भरलेला दिसतो. ‘भारत आज भी सारे जहां से अच्छा’ आहे.”, असे ते म्हणाले.

ISRO, NASA, Axiom Space आणि SpaceX यांच्या सहकार्याबद्दल शुक्ला म्हणाले, “या मोहिमेतून मी आठवणी आणि ज्ञान घेऊन येत आहे, जे मी इतरांपर्यंत पोहोचवेन. जगभरातील लोक एकत्र येऊन काम करतात, तेव्हा मानवजात काय करू शकते हे अविश्वसनीय आहे.”

पृथ्वीवर कधी परतणार?

पृथ्वीभोवती सुमारे 230 प्रदक्षिणा पूर्ण करून आणि 60 लाख मैलांपेक्षा जास्त प्रवास केल्यानंतर, Axiom-4 मोहिमेचे अंतराळवीर आज (14 जुलै) पृथ्वीवर परतण्यास सज्ज झाले आहेत.

इस्रोने (ISRO) दिलेल्या माहितीनुसार, ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) वेगळे झाल्यानंतर 15 जुलैला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्याकिनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. हे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आपल्यासोबत 580 पाउंड पेक्षा जास्त वजन घेऊन परत येणार आहे, ज्यात नासाचे (NASA) हार्डवेअर आणि मोहिमेदरम्यान केलेल्या 60 हून अधिक प्रयोगांचा डेटा समाविष्ट आहे.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर 14 जुलै रोजी दुपारी 2:25 वाजता स्पेसक्राफ्टमध्ये बसतील आणि पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आवश्यक चाचण्या पूर्ण करतील.