Indian Companies in UK : ब्रिटनमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांनी यंदा विक्रमी वाढ नोंदवली आहे.. ‘ग्रँट थॉर्नटन’ आणि ‘सीआयआय’च्या 12व्या वार्षिक ‘इंडिया मीट्स ब्रिटन ट्रॅकर’ अहवालानुसार, या कंपन्यांची संख्या 23 टक्क्यांनी वाढून 1,197 वर पोहोचली आहे, जी आजवरची सर्वाधिक वार्षिक वाढ आहे.
या कंपन्यांचा एकत्रित महसूल 2024 मधील 68.09 अब्ज पौंडांवरून 72.14 अब्ज पौंडांवर गेला आहे. हा अहवाल लंडनमधील ‘यूके-इंडिया वीक’ दरम्यान इंडिया ग्लोबल फोरममध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि यूकेचे व्यवसाय सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
भारतीय कंपन्यांचा यूकेमधील प्रभाव
या भारतीय कंपन्यांनी यूकेमध्ये 126,720 लोकांना रोजगार दिला असून, गेल्या वर्षभरात 8,000 हून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण केल्या. त्यांचा सरासरी वाढीचा दर 42 टक्के असून, एकूण टर्नओव्हर 32.6 अब्ज पौंडांवर पोहोचला आहे. या कंपन्यांनी 67.3 दशलक्ष पौंड कॉर्पोरेशन टॅक्स भरला आणि 56,000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण केल्या. विप्रो आयटी सर्व्हिसेस यूके सोसिएटासने 448 टक्के महसूल वाढीसह अव्वल स्थान पटकावले, तर झोहो कॉर्पोरेशन लिमिटेडने 197 टक्के वाढ नोंदवली.
डन हे भारतीय कंपन्यांसाठीचे प्रमुख केंद्र आहे. येथे 47 टक्के कंपन्यांची मुख्यालये आहेत. विशेष म्हणजे, महिला संचालकांचे प्रमाण 21 टक्क्यांवरून 24 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सीआयआयने म्हटले की, “हा अहवाल भारताच्या थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रभाव दर्शवतो आणि मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय संबंधांना आणखी बळ मिळेल.”
भारत आणि यूकेमधील वाढत्या व्यापारी आणि गुंतवणूक संबंधांमुळे भारतीय कंपन्यांसाठी यूकेमध्ये नवीन संधी निर्माण होत आहेत.