स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या निधीत तिपटीने वाढ, पैशाचा नेमका आकडा किती? जाणून घ्या

Indian Money in Swiss Banks

Indian Money in Swiss Banks | स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या पैशात मोठी वाढ झाली आले. स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा 2024 मध्ये तिपटीने वाढला असून, तो 3.5 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे 37,600 कोटी रुपये इतका झाला आहे.

स्विस नॅशनल बँकेने (जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत ठेवलेल्या निधीतील मोठी वाढ याला कारणीभूत आहे.

ग्राहक खात्यांमधील वाढ मर्यादित

भारतीय ग्राहकांच्या खात्यांमधील ठेवींमध्ये मात्र केवळ 11 टक्के वाढ झाली असून, त्या 346 दशलक्ष स्विस फ्रँक (सुमारे 3,675 कोटी रुपये) इतक्या झाल्या आहेत. हा आकडा एकूण निधीच्या फक्त दहा टक्के आहे. उर्वरित निधी हा इतर बँका, ट्रस्ट आणि सिक्युरिटीजच्या माध्यमातून जमा झाला आहे.

2023 मध्ये भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या निधीत 70 टक्क्यांची घसरण झाली होती, ज्यामुळे तो 1.04 अब्ज स्विस फ्रँकच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. 2024 मधील ही वाढ 2021 नंतरची सर्वाधिक आहे, जेव्हा भारतीयांचा निधी 3.83 अब्ज स्विस फ्रँकच्या 14 वर्षांच्या उच्चांकावर होता.

निधीचे तपशील

स्विस नॅशनल बँकेच्या आकडेवारीनुसार, 2024 मधील 3,545.54 दशलक्ष स्विस फ्रँकच्या एकूण रकमेचा समावेश खालीलप्रमाणे आहे:

  • ग्राहक ठेवी: 346 दशलक्ष स्विस फ्रँक (2023 मध्ये 310 दशलक्ष)
  • इतर बँकांमार्फत: 3.02 अब्ज स्विस फ्रँक (2023 मध्ये 427 दशलक्ष)
  • ट्रस्ट/फिड्युशियरीज: 41 दशलक्ष स्विस फ्रँक (2023 मध्ये 10 दशलक्ष)
  • रोखे आणि सिक्युरिटीज: 135 दशलक्ष स्विस फ्रँक (2023 मध्ये 293 दशलक्ष)

काळा पैसा नाही, SNB चा खुलासा

स्विस बँकांनी कळवलेली ही आकडेवारी भारतीयांचा कथित काळा पैसा दर्शवत नाही, असा दावा SNB ने केला आहे. यात भारतीय, अनिवासी भारतीय किंवा तृतीय-देशातील संस्थांच्या नावे ठेवलेला पैसा समाविष्ट नाही. 2006 मध्ये भारतीयांचा निधी 6.5 अब्ज स्विस फ्रँकच्या विक्रमी पातळीवर होता, परंतु त्यानंतर तो अनेक वर्षे घसरत राहिला.

बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या (BIS) आकडेवारीनुसार, स्विस बँकांमधील भारतीय गैर-बँक ग्राहकांच्या ठेवी 2024 मध्ये 6 टक्क्यांनी वाढून 74.8 दशलक्ष डॉलर (सुमारे 650 कोटी रुपये) झाल्या. 2023 मध्ये यात 25 टक्के घसरण झाली होती.

2018 पासून भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये करविषयक माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण सुरू आहे. याअंतर्गत भारतीय कर अधिकाऱ्यांना स्विस बँकेतील भारतीय खात्यांची माहिती दरवर्षी मिळते. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयित प्रकरणांमध्येही स्वित्झर्लंडने शेकडो खात्यांची माहिती भारताला दिली आहे.

जागतिक क्रमवारीत भारत 48 व्या स्थानी

स्विस बँकांमध्ये परदेशी ग्राहकांच्या निधीत युनायटेड किंगडम (222 अब्ज स्विस फ्रँक) अव्वल आहे, तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. भारत 2023 मध्ये 67 व्या स्थानावरून 2024 मध्ये 48 व्या स्थानी पोहोचला आहे. शेजारील बांगलादेशातही निधीत मोठी वाढ झाली, तर पाकिस्तानात घट दिसून आली.