Bankim Brahmbhatt BlackRock Fraud : अमेरिकेतील खासगी कर्ज बाजारपेठेत (Private Credit Market) मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भारतीय वंशाचे दूरसंचार कार्यकारी अधिकारी बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची कर्ज फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने हा दावा सर्वप्रथम उघड केला असून, या फसवणुकीमुळे जगातील सर्वात मोठी आर्थिक संस्था ‘ब्लॅकरॉक’सह अनेक मोठ्या कर्जदात्यांना धक्का बसला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज:
ब्रह्मभट्ट यांनी त्यांच्या ‘ब्रॉडबँड टेलिकॉम’ आणि ‘ब्रिजव्हॉईस’ या कंपन्यांच्या माध्यमातून हे कर्ज घेतले. ऑगस्टमध्ये दाखल केलेल्या खटल्यानुसार, त्यांनी अस्तित्वात नसलेले उत्पन्न दाखवले, बनावट ग्राहक खाती तयार केली आणि बनावट पावत्यांच्या आधारावर एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्ससारख्या कर्जदात्यांकडून कोट्यवधी डॉलर्सची कर्जे मिळवली. वकिलांनी दावा केला आहे की, “ब्रह्मभट्ट यांनी मालमत्तेची एक विस्तृत ताळेबंद तयार केली, जी केवळ कागदावर अस्तित्वात होती.”
कर्जदाते आणि रकमेचा तपशील:
सप्टेंबर 2020 मध्ये एचपीएसने ब्रह्मभट्टच्या कंपनीला पहिली क्रेडिट लाइन दिली. ऑगस्ट 2024 पर्यंत ही रक्कम सुमारे 430 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली होती. या कर्जापैकी जवळपास अर्धा भाग फ्रेंच बँकिंग समूह बीएनपी परिबासने एचपीएस व्यवस्थापित क्रेडिट फंडांद्वारे केला होता.
तपासात काय उघड झाले?
जुलैमध्ये एचपीएसच्या एका कर्मचाऱ्याला ईमेलमध्ये विसंगती आढळल्यानंतर फसवणुकीचे संकेत मिळाले. स्पष्टीकरण विचारले असता, ब्रह्मभट्ट यांनी सुरवातीला ‘क्षुल्लक विसंगती’ असल्याचे सांगून नंतर प्रतिसाद देणे बंद केले.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी न्यूयॉर्कमधील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली असता, ते बंद आणि रिकामे आढळले. निवासस्थानाबाहेर 2 BMW, 1 पोर्शे, 1 टेस्ला आणि 1 ऑडी गाड्या उभ्या होत्या, पण तेथे कोणी नव्हते.
दिवाळखोरी आणि स्थलांतराचा संशय:
फसवणूक उघडकीस आल्यानंतर, ब्रह्मभट्ट यांच्या अनेक कंपन्यांनी ‘चॅप्टर 11’ दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला. 12 ऑगस्ट 2025 रोजी ब्रह्मभट्ट यांनी स्वतः वैयक्तिक दिवाळखोरीसाठी अर्ज केला.
- कर्जदात्यांनी दाखल केलेल्या खटल्यानुसार, कर्जातील काही रक्कम भारत आणि मॉरिशसच्या ऑफशोअर खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचा आरोप आहे.
- एचपीएसच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की, ब्रह्मभट्ट यांनी जुलैमध्ये अमेरिका सोडली असून ते भारतात गेले असावेत.
या प्रकरणामुळे खासगी कर्ज बाजारपेठेतील नियंत्रण आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हे देखील वाचा – Rohan Bopanna : रोहन बोपण्णांचा प्रोफेशनल टेनिसला रामराम! निवृत्तीच्या भावनिक पोस्टमध्ये म्हणाले…









