IRCTC Account Deactivation: रेल्वेने 2.5 कोटी IRCTC अकाउंट्स केले बंद, कारण काय?

IRCTC Account Deactivation

IRCTC Account Deactivation: भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीच्या (IRCTC) तिकीट बुकिंग प्रणालीमधून तब्बल 2.5 कोटींपेक्षा अधिक अकाउंट्स बंद (IRCTC Account Deactivation) केले आहेत. ही कारवाई मुख्यतः ‘बॉट्स’ आणि एजंटद्वारे होणाऱ्या गैरवापराला आळा घालण्यासाठी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तिकीट बुकिंग अधिक पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

संसदेत खासदार ए. डी. सिंह यांनी बुकिंग सुरू होताच काही मिनिटांत तिकिटे गायब कशी होतात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक डेटा विश्लेषणाच्या मदतीने संशयास्पद आणि स्वयंचलित बुकिंग करणाऱ्या लाखो खात्यांची तपासणी केली. त्यातून अनेक निष्क्रिय किंवा बॉटद्वारे नियंत्रित अकाउंट्स बंद करण्यात आली.

प्रवाशांसाठी नवीन उपाययोजना

रेल्वेने या निर्णयासोबतच प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे बदलही केले आहेत:

  • डिजिटल पेमेंट सुविधा: आता पीआरएस काउंटरवरही डिजिटल पेमेंट करता येईल.
  • अधिक डबे व विशेष गाड्या: गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त डबे लावले जात आहेत.
  • विकल्प योजना व अपग्रेडेशन: प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना पर्यायी गाडीत जागा किंवा श्रेणीसुधारित सीट दिली जाईल.

तिकिटांची मागणी वेळेनुसार सतत बदलत असते. काही गाड्यांची तिकिटे काही मिनिटांत संपतात, तर इतर गाड्यांत जागा उरते. त्यामुळे रेल्वे आता रिअल-टाइम मागणी विश्लेषण आणि लवचिक बुकिंग प्रणाली वापरत आहे.

रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करत ओटीपी आधारित पडताळणी सुरू केली आहे. यापुढे आधार संलग्न आयआरसीटीसी खात्याद्वारेच तिकीट बुकिंग करता येणार आहे. यामुळे बनावट तात्काळ तिकिटांना आळा घालणे शक्य होईल. तात्काळ तिकीट बुकिंगचा हा नवीन नियम 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आला आहे.

नवीन नियम लागू झाल्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाइटआणि ॲपवर केवळ आधार पडताळणी झालेले ग्राहकच तिकीट बुक करू शकतील.

ऑफलाइन बुकिंगमध्येही डिजिटल सुविधा

रेल्वेमंत्र्यांनी असेही सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी ऑफलाइन तिकीट बुकिंग काउंटरवरही (पीआरएस) आता ऑनलाइन किंवा डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी आता यूपीआयद्वारे ऑफलाइन माध्यमातूनही तिकीट बुक करू शकतात.